ईदच्या मिरवणुकीने दुमदुमले चंद्रपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:23 IST2018-11-21T22:22:41+5:302018-11-21T22:23:22+5:30
इस्लाम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोल्हासात साजरा झाला. यानिमित्त चंद्रपुरात बुधवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहर दुमदुमले. यावेळी हिंदू, मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन एकात्मतेचा परिचय दिला.

ईदच्या मिरवणुकीने दुमदुमले चंद्रपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इस्लाम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोल्हासात साजरा झाला. यानिमित्त चंद्रपुरात बुधवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहर दुमदुमले. यावेळी हिंदू, मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन एकात्मतेचा परिचय दिला.
ईद ए मिलादनिमित्त बुधवारी सकाळपासूनच चंद्रपुरात उत्साहाचे वातावरण होते. मिरवणुकीची सुरुवात सकाळी १० वाजता गांधी चौकातून करण्यात आली. जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून परत जटपुरा गेट, गिरणार चौक अशी मिरवणूक फिरल्यानंतर दारुल मोहम्मदिया मस्जिद दादमहल वॉर्ड येथे विसर्जित झाली. या मिरवणुकीत हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर सर्वांनी लंगरचा लाभ घेतला.
ठिकठिकाणी स्वागत
मिरवणुकीच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्रीच प्रमुख मार्गावर मंच उभारण्यात आले होते. बुधवारी मिरवणूक निघताच विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मसालेभात व सरबतही वितरण करण्यात आले.
युवकांची स्वच्छता मोहीम
मिरवणुकीदरम्यान होणारा कचरा तत्काळ स्वच्छ करण्यासाठी युवकांची एक चमू कार्यरत होती. मिरवणूक ज्या मार्गावरून गेली, त्या मार्गावर हे युवक स्वच्छता मोहीम राबवित होते. त्यामुळे मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर लगेच शहर स्वच्छ दिसत होते.