चंद्रपूरला पडतोय गर्दचा विळखा

By Admin | Updated: December 14, 2015 00:52 IST2015-12-14T00:51:12+5:302015-12-14T00:52:24+5:30

जिल्ह्यात दारूबंदीनंतर व्यसनाधिनांनी गांजा आणि गर्दसारख्या विषारी व्यसनांना जवळ केले असल्याचे दिसून येत आहे.

Chandrapur is falling into the ocean | चंद्रपूरला पडतोय गर्दचा विळखा

चंद्रपूरला पडतोय गर्दचा विळखा

गांजाची विक्रीही जोमात : दुर्गापुरात एकाला अटक, पाळत ठेवून केली कारवाई
चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदीनंतर व्यसनाधिनांनी गांजा आणि गर्दसारख्या विषारी व्यसनांना जवळ केले असल्याचे दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर गर्द आणि गांजा विकला जात आहे. या विक्रीवर निर्बंध आणण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी शनिवारी रात्री एका गर्द विक्रेत्याला अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या.
दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अयप्पा मंदिर जवळील चेकपोस्टच्या बाजुला एका पानठेल्यासमोर मध्यरात्री १२.३० वाजतानंतर एक गर्द विक्रेता ग्राहकांना अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक के.टी.रामटेके, डी.आर.बांडे, सहायक फौजदार पिपरे, नायक पोलीस शिपाई मनोहर मत्ते, विनोद यादव, रजनिकांत पुठ्ठावार, पोलीस शिपाई धीरज लोधी, आनंद खरात, संदीप कामडी, चालक संतोष राऊत यांनी अयप्पा मंदिर परिसरात सापळा रचला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास एक इसम तेथे आला. पोलिसांनी लगेच त्याला पकडून त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ गर्द ठेऊन असलेल्या ३४ कागदी पुड्या आढळून आल्यात. त्यात २५०० रुपये किंमतीची अडीच ग्रम गर्द होती. यासोबतच १० हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल, रोख दोन हजार ३० रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दुर्गापूर पोलीस ठाण्यात गर्द विक्रेत्याविरुद्ध कलम ८ (कक़ २१ एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास दुर्गापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी.आर.बांडे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Chandrapur is falling into the ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.