चंद्रपूर जिल्हा कारागृह हाऊसफुल्ल
By Admin | Updated: January 22, 2016 01:58 IST2016-01-22T01:58:14+5:302016-01-22T01:58:14+5:30
चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येमुळे हाऊसफुल्ल झाले आहे. दारूविक्रीच्या गुन्ह्यातील वाढते

चंद्रपूर जिल्हा कारागृह हाऊसफुल्ल
चंद्रपूर : चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येमुळे हाऊसफुल्ल झाले आहे. दारूविक्रीच्या गुन्ह्यातील वाढते आरोपी व विविध प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपुरातील कैद्यांना अकोला येथील कारागृहात रवानगी करण्यात येत आहे.
कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतील जवळपास १५० कामगारांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी आंदोलन केले. त्यातील ८१ कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व कामगारांनी न्यायालयात जामीन घेण्यास नकार दिल्याने त्यांची रवानगी चंद्रपूर कारागृहात जागा नसल्याने अकोला कारागृहात करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची ३३३ कैद्यांची क्षमता आहे. परंतु या कारागृहात आधीच विविध गुन्ह्यातील आरोपी शिक्षा भोगत आहेत.
तर १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने दररोजच दारूविक्रेत्यांना अटक केली जात असून १५ ते २० अवैध दारूविक्रेत्यांची रवानगी कारागृहात केली जात आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सध्याची स्थिती अत्यंत ‘टाईट’ असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या एका अधिकाऱ्याने आपले नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
एम्टाचे ८१ कामगार
अकोला कारागृहात
४कर्नाटक एम्टा खाणीतील कामगारांनी बुधवारी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी भद्रावती येथे आंदोलन केले. पेट्रोलपंप चौकापासून पोलीस ठाण्यापर्यंत कामगारांनी रॅली काढून प्रशासनाने मागण्या मान्य कराव्या अन्यथा आम्हाला अटक करावी म्हणून पोलीस ठाण्यातच आंदोलन सुरू केले. त्यामुळे जवळपास दीडशे कामगारांना अटक करण्यात आली. यातील ८१ कामगारांनी जामीन नाकारल्याने त्या सर्वांची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली आहे. गेल्या ९ महिन्यापासून कर्नाटक एम्टा खुली कोळसा खाण बंद आहे. याठिकाणी कार्यरत कामगारांना खाण बंद पडल्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. तसेच खाण सुरू असताना देण्यात येणाऱ्या इतर सुविधाही बंद करण्यात आल्या. वेतन मिळत नसल्याने कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. वेतनवाढ, स्थायी नोकरी या मागण्यांच्या पुर्ततेसाठी कंपनीच्या विरोधात कामगारांनी लोकप्रतिनिधींसोबत अनेक आंदोलने केलीत. परंतु, त्याचा फायदा झाला नाही. खाण बंद झाली तेव्हापासून कोणत्याही नेत्यांने कामगारांची भेट घेतली नाही. विद्यमान खासदारांकडून आश्वासनाच्या पलिकडे काहीच मिळाले नसल्याचा आरोप कामगारांचा आहे. (शहर प्रतिनिधी)