चंद्रपूर जिल्ह्यातच दारुडे आहे का?
By Admin | Updated: February 7, 2015 00:33 IST2015-02-07T00:33:10+5:302015-02-07T00:33:10+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काही विषयांवर हरकत घेत सदस्यांनी गोंधळ घातला.

चंद्रपूर जिल्ह्यातच दारुडे आहे का?
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काही विषयांवर हरकत घेत सदस्यांनी गोंधळ घातला. यात दारुबंदी निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव विशेष गाजला.
दारुबंदी करायचीच आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात करा. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच दारुडे आहे, का असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर, विनोद अहिरकर, दिनेश चिटणूरवार, अमर बोडलावार आदींनी केला. एवढेच नाही तर, अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ केला. या गोंधळाचे एका सदस्याने चित्रकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र अध्यक्षांनी त्याला चित्रकरण करण्यास मज्जाव केला. गोंधळामुळे याबाबत ठराव होऊ शकला नाही.
हागणदारी मुक्तीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी गावागावांत दौरे करीत आहे. मात्र अध्यक्षांच्या क्षेत्रातील असलेल्या सुशीदाबगावातील आश्रमशाळा परिसरात सर्वत्र दुर्गंधी असल्याने अध्यक्षांनी प्रथम आपल्या क्षेत्रातील गावांची स्वच्छता करण्याचे काही सदस्यांनी सुचविले. विशेष म्हणजे, बल्लारपूर तालुक्याला निर्मल करण्यात येणार असून तालुका मॉडेल बनविण्यात येणार असल्याचे सभागृहात अध्यक्षांनी सांगितले. मात्र तालुक्यातील अनेक गावांत अद्यापही शौचालय नसल्याचे सदस्यांनी अध्यक्षांच्या लक्षात आणून दिले. एवढेच नाही तर या तालुक्यात केवळ तीन गावांत हागणदारीमुक्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्यांनी यापूर्वी ५०० तथा १ हजार २०० रुपयांच्या योजनेतून शौचालय बांधकाम केले. ते शौचालय आता कुचकामी झाले असल्याने नव्याने निधी देण्याची मागणी वारजूकर यांनी केली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून येथील वसंत भवन तसेच सभापतींच्या कक्षांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. मात्र या कामात जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अभियंत्यांनी भ्रष्टाचार केला असून कामे निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करण्यात आला. नागभीड तालुक्यातील नांदेड या गावातील सरपंच सत्तार शेख यांनी गावात अनेक लोकाभूमिक कामे केली आहे. त्यांच्या कामाची केंद्रसरकारने दखल घेत त्यांचा दिल्ली येथे सत्कार केला. मात्र त्यांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा परिषद विसरल्याचे वारजूकर यांनी लक्षात आणून दिले. (नगर प्रतिनिधी)