चंद्रपूर बंदला अल्प प्रतिसाद
By Admin | Updated: February 5, 2016 00:44 IST2016-02-05T00:44:44+5:302016-02-05T00:44:44+5:30
दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तिरावरील बंद स्मशानभूमीत पे्रत जाळण्याच्या प्रकरणावरून प्रशासन आणि पोलिसांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.

चंद्रपूर बंदला अल्प प्रतिसाद
चंद्रपूर : दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तिरावरील बंद स्मशानभूमीत पे्रत जाळण्याच्या प्रकरणावरून प्रशासन आणि पोलिसांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा उघडण्याच्या वेळी आंदोलनकर्ती मंडळी दुकाने बंद ठेवण्यासाठी फिरत असतानाच पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. तर १२ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली.
सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शहरातील बाजारपेठा उघडण्याच्या वेळी बंदकर्त्यांनी व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन करीत शहरातून फिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. व्यापारपेठा उघडण्याच्या वेळी काही ठिकाणी पोलीस स्वत:हून दुकाने उघडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करीत असल्याचे दिसले. जटपुरा गेट, गांधी चौक, छोटा बाजार चौक आदी ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत अनेकांना ताब्यात घेतले. रामनगर पोलिसांनी १२ कार्यकर्ऱ्यांना अटक करून भादंवि १४३, १८८ कलमानुसार गुन्हे दाखल केले. शहरातील अनेक दुकाने दुपारी १२ वाजतानंतर उघडली, तर काहींनी दुपारी दोन वाजतानंतर बाजारपेठा उघडल्या. बंदचे आवाहन लक्षात घेता शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी अघोषित सुट्टी दिली होती. दुपारनंतर काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती जाणवली. पेट्रोल पंप, चित्रपटगृहे नेहमीप्रमाणे सुरू होती. (जिल्हा प्रतिनिधी)
बंदच्या सफल झाल्याचा आवाहनकर्त्यांचा दावा
सकाळी ८ ते दुपारी २ वाजपर्यंत बंद पाळण्याचे व्यापारी आणि जनतेला आवाहन केले होते. त्यानुसार दुपारी २ वाजेपर्यंत बंद यशस्वीपणे पार पडल्याचा दावा शहर काँग्रेस कमेटीचे गजानन गावंडे गुरूजी यांनी एका पत्रकातून केला आहे. स्मशानभूमीचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असतानाही बालाजी मंदीरासमोरील स्मशानभूमीवर प्रेत जाळण्यासाठी पालकमंत्र्यांच्या दबावात प्रशासन आणि पोलिसांनी परवानगी देणे हा प्रकार गंभीर असून जनतेच्या भावना दुखाविण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कृत्याबद्दल न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.