चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वे स्थानक होणार ‘हरित’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 00:33 IST2017-06-16T00:33:57+5:302017-06-16T00:33:57+5:30

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करून

Chandrapur, Ballarpur railway station to be 'green' | चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वे स्थानक होणार ‘हरित’

चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वे स्थानक होणार ‘हरित’

पालकमंत्र्यांचा पुढाकार : शासनाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करून ही रेल्वस्थानके हरित रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील पहिले हरित रेल्वे स्थानके ठरणार आहेत.
जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृती व पर्यटन वाढीच्या दृष्टीने व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सवाई मोधोपूरच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकांवर खुल्या जागेवर शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर यांना ताडोबाच्या धर्तीवर चित्र रंगविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून वन आणि वन्यजीव यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच अधिष्ठाता शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर यांनी या संदर्भात सादर केलेल्या अंदाजपत्रकांना शासनाने मान्यता दिली असून या शासकीय संस्थेच्या माध्यमातून तसेच कला संचालनालयाच्या माध्यमातून ही दोन्ही रेल्वे स्थानके हरित रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर आणि बल्लारपूर ही दोन्ही रेल्वे स्थानके आता हिरवाईने नटून नवे रूप धारण करत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहेत.

Web Title: Chandrapur, Ballarpur railway station to be 'green'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.