चंद्रपूरात २१० घंटागाड्यातून दररोज गोळा होतो १३५ टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:08+5:302021-01-09T04:23:08+5:30
चंद्रपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना दररोज निघणारा कचरा संकलन करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे किंवा त्याचा पुनर्वापर ...

चंद्रपूरात २१० घंटागाड्यातून दररोज गोळा होतो १३५ टन कचरा
चंद्रपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना दररोज निघणारा कचरा संकलन करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे किंवा त्याचा पुनर्वापर करणे हे मोठे आव्हानात्मक आहे. त्यातही या कामांची जबाबदारी कंत्राटी असल्याने नवनवीन संकटे निर्माण होतात. मात्र, ३५० स्वच्छता कामगार कर्तव्यात कसूर न करता सेवा बजावत आहेत. परिणामी, शहरातून दररोज २१० घंटागाड्याद्वारे १३५ टन कचरा गोळा केला जात आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या आता सुमारे पाच लाखांपर्यंत पोहोचली. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता, मलनिस्सारण आणि अन्य पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. सात झोनमध्ये विभागालेल्या शहरातून दररोज निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा प्रश्न मोठा आव्हानात्मक आहे. सध्या शहरातून कचरा संकलन करण्यासाठी १९८ घंटागाड्यांचा नियमित वापर सुरू आहे. १० घंटागाड्या राखीव ठेवण्यात आल्या. ३५० कामगार १९८ घंटागाड्यांमधून दररोज १३५ ते ४० टन कचरा संकलन करतात. ३० वाहनांमधून कचरा डम्पिंग डेपोमध्ये नेला जातो.
निरीक्षकांकडून घंटागाड्यांवर वाॅच
शहरातून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवर वॉच ठेवण्यासाठी झोननिहाय निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, आधुनिक जीपीएस यंत्रणेचा अभाव आहे. त्यामुळे स्वच्छता विभागातील सर्व घटकांमध्ये समन्वय ठेवण्यात अडचणी येतात. स्वच्छतेसाठी लागणारी आधुनिक साधने नसल्याने कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातही समस्या कायम आहेत.
कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापरासाठी कंपोस्ट खत निर्मिती
गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर प्रक्रियेसाठी पाठविला जातो. गडचांदूर येथील अंबुजा सिमेंट प्रकल्पात पुनर्वापरासाठी प्रक्रिया होते. कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून महानगरपालिकेच्या बगिच्यासाठी वापरण्यात येत आहे. नागरिकांनी मागणी केल्यास त्यांचीही विक्री केली जाते.
कोट
चंद्रपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घंटागाड्यांची संख्या वाढविण्यात आली. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहील, याकडेही लक्ष देणे सुरू आहे. स्वच्छतेचे काम हे अविरत चालणारे आहे. यात कधीच खंड पडणार नाही, यादृष्टीने महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशांचे काटेकोर पालन करणे सुरू आहे.
-डॉ. संतोष गर्गेलवार, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, मनपा चंद्रपूर