तंटामुक्त समित्यांसमोर आव्हान
By Admin | Updated: September 12, 2015 01:01 IST2015-09-12T01:01:00+5:302015-09-12T01:01:00+5:30
गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत. दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे.

तंटामुक्त समित्यांसमोर आव्हान
गुंजेवाही : गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत. दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे. गावासाठी गावातच लोकसहभागातून तत्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे, गावातील व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मूलन करणे, अनिष्ट प्रथा व चालिरीती नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आदी उद्दिष्ट समोर ठेवून राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गावागावांत स्थापन करण्यात आलेल्या या समित्यापुढे मात्र अवैध धंद्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करून गावाचा विकास साध्य करावयाचा असतो. अवैध धंदे, धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापीही साध्य होणार नाही. दारू, मटका, वरली हे भांडण तसेच शांतता धोक्यात येण्याचे मुळ कारण आहे. यामुळे अशा अवैध धंद्यालाच मूठमाती दिली तर गावांची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल होण्यास वेळ लागणार नाही. यावर शिक्कामोर्तब करून गावकऱ्यांच्या सहकार्याने तंटामुक्त गाव समितीने अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे शासनाने सुचविले आहे.
त्या दृष्टीने प्रत्येक गावातील तंटामुक्त समितीने अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करणे, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबविणे, व्यसनी लोकांचे समुपदेशन करणे, आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेणे वा इतर कामी पोलिसांना सहकार्य करणे ही कामे समिती पदाधिकाऱ्यांना करावी लागतात. भांडण तंटे व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दारूला गावातून हद्दपार करण्याचे कर्तव्य तंटामुक्त गाव समित्यांनी पोलिसांच्या सहकार्याने पार पाडणे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अपेक्षित आहे. मात्र याचा विसर बहुतांश समितीच्या पदाधिकाऱ्यांना पडल्याने गावात दारूसह अवैध धंद्याचे अस्तित्व अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.
गावात शांतता राहावी, गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा. यासाठी प्रत्येक तंटामुक्त गाव समितीने सभा बोलावून गावात असलेले अवैध धंदे हद्दपार करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे.
धंदे हद्दपार करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. तसेच त्याची प्रत पोलीस ठाण्याला द्यावी. अवैध धंदे करणाऱ्या धंदेवाईकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे आणि अवैधधंदे बंद करण्यासाठी विनवणी करावी.
तरीही अवैध धंदे बंद होत नसतील तर संबंधित पोलीस ठाण्याचे सहकार्य घेऊन त्यावर योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने करणे तंटामुक्त गाव मोहिमेसाठी अतिशय आवश्यक आहे. तरच समित्यांना बळ येऊ शकणार आहे. (वार्ताहर)