तहसील कार्यालयात खुर्च्या रिकाम्या
By Admin | Updated: May 15, 2015 01:05 IST2015-05-15T01:05:00+5:302015-05-15T01:05:00+5:30
येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांच्या रिक्त पदांमुळे बहुतांश कामाचा खोळंबा होत आहे.

तहसील कार्यालयात खुर्च्या रिकाम्या
नागभीड : येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांच्या रिक्त पदांमुळे बहुतांश कामाचा खोळंबा होत आहे. आज गुरुवारी तहसील कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे कामासाठी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले.
येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराची चार पदे मंजूर आहेत. पण विविध कारणांमुळे तीन पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. एक नायब तहसीलदार येथे कार्यरत होते. पण त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते सुद्धा रजेवर गेले असल्याचे सुत्राने सांगितले. नागभीड तालुक्याचा पसारा मोठा आहे. गिरगाव पासून तर मौशीपर्यंत या तालुक्याचा व्याप असून ११२ गावांचा या तालुक्यात समावेश आहे.
सध्यास्थितीत शासनाने विविध योजना सुरू केल्या त्याचबरोबर अनेक योजनांचे विकेंद्रीकरणही केले आहे. या योजनांसाठी आणि वैयक्तिक कामासाठी रोजच शेकडो नागरिकांची तहसील कार्यालयात ये-जा सुरू असते. अशाच कामासाठी गुरूवारी अनेक नागरिक येथील तहसील कार्यालयात आले. पण एकही जबाबदार अधिकारी हजर नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागले.
दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने यासंदर्भात माहिती घेतली असता येथील तीन नायब तहसीलदाराची पदे रिक्त आहेत. तर तहसीलदार श्रीराम मुंदडा शासकीय बैठकीला ब्रह्मपुरी येथे गेल्याची माहिती मिळाली. गुरुवार हा दिवस येथील बाजाराचा दिवस असल्याने काम घेवून येणाऱ्यांची संख्या गुरुवारी अधिक असते. त्यामुळे निदान सोमवारी आणि गुरुवारी जबाबदार अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित असावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)