प्रमाणपत्र दिले; मालकी हक्क नाही
By Admin | Updated: January 12, 2016 00:52 IST2016-01-12T00:52:35+5:302016-01-12T00:52:35+5:30
राजुरा तालुक्यातील सिर्सी व कोलामगुडा (मूर्ती) येथील आदिवासी शेतकऱ्यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी

प्रमाणपत्र दिले; मालकी हक्क नाही
आदिवासींची थट्टा : वनजमीन प्रकरण
राजुरा : राजुरा तालुक्यातील सिर्सी व कोलामगुडा (मूर्ती) येथील आदिवासी शेतकऱ्यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्क मान्य करणे) नियमाप्रमाणे सन २००९-१० ला ताब्यात असलेल्या वन जमिनीचे व वन हक्काचे प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु त्यानंतरची मोजणी करून ताब्यात असलेल्या वन जमिनीच्या मालकी हक्काचा सातबारा अद्यापही देण्यात आला नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेच्या लाभापासून वंचित आहे.
सिर्सी येथील पोचू भिमा सोयाम, मेंगु राजम शिडाम, आनंद भिमा सोयाम, तानाजी पत्रू कोडापे, अंजनाबाई गणपत सोयाम, भीमराव पोला सोयाम व इतर ३० तसेच कोलामगुडा (मूर्ती) येथील भीमराव सोयाम व इतर २५ यांना वन हक्क प्रमाणपत्राचे वाटप सन २००९-१० मध्येच करण्यात आले.
त्यानंतर मोजणी करून ताब्यात असलेल्या वन जमिनीचा मालकी हक्काचा सातबारा मात्र अद्यापही देण्यात आला नाही. यासाठी प्रमाणपत्रधारकांनी राजुरा तहसील कार्यालयात पाच वर्षापासून पायपीट सुरू ठेवली आहे. परंतु त्यांचा कोणीच वाली नसल्यामुळे मालकी हक्काच्या सातबारापासून हे आदिवासी बांधव वंचित आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेच्या लाभाअभावी त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी उपोषणाचा इशारा आता त्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)