सीईओ धडकले दत्तक गावात
By Admin | Updated: September 2, 2016 00:48 IST2016-09-02T00:48:45+5:302016-09-02T00:48:45+5:30
ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहे.

सीईओ धडकले दत्तक गावात
ग्रामविकासाचा घेतला आढावा : गावांचा चेहरामोहरा बदलणार
चंद्रपूर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांनी कोरपना या दुर्गम तालुक्यातील खिरडी व रुपापेठ ही दोन गावे दत्तक घेतली. या दोन गावांचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर देवेंदर सिंह यांनी काल बुधवारी आपल्या दत्तक गावात आकस्मिक धडक दिली व गावांच्या संपूर्ण विकासासाठी काय आवश्यक आहे, याची खातरजमा करून तशा सूचना संबंधितांना केल्या.
जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देवेंदर सिंह रुजु झाल्यावर जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामविकासासाठी नवनविन संकल्पना साकारल्या जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांना पंचायत समितीनिहाय संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने ग्रामविकासात गती निर्माण करण्याचे काम केले जात आहे. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी कोरपना तालुक्यातील खिरडी, रुपापेठ या दोन मागासलेल्या व दुर्गम गावांच्या विकासाची स्वत: जबाबदारी घेतली आहे. ही दोन गावे आदर्श करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार व्यस्त वेळेतून वेळ काढून गावात जाऊन गावसभा, गावफेरी, ग्रामस्थांशी चर्चा करुन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आता त्यांनी सुरु केला आहे. त्या अनुषंगाने या गावांना सिंह यांनी बुधवारी भेट दिली. गावांचा सर्वांगीण विकास करुन ग्राम आदर्श करण्यासाठी सर्वप्रथम ग्राम हागणदारीमुक्त केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केल्या.
गाव सर्वप्रथम हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामस्तरावर तीन पुरुष व तीन महिला यांची स्वच्छतेचे प्रेरक म्हणून निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दोन्ही गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळा, अंगणवाडीची दुरुस्ती, रंगरंगोटी याशिवाय गावातील युवकांना शासनातील विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा म्हणून स्पर्धा परीक्षाच्या पुस्तकांनी सज्ज असणारे वाचनालय मंजूर करण्यात आले. याशिवाय गावस्तरावरील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केन्द्राची त्यांनी स्वत: जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या सुविधा हव्या, याविषयीच्या सूचनाही सबंधितांना केल्या. यावेळी कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, शिक्षणाधिकारी घारकर, कोरपना पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छ भारत मिशनचे आयईसी कृष्णकान्त खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, अभियंता स्वच्छता तज्ज्ञ तृशांत शेंडे, रोहण बालमवारव मोठ्या प्रमाणात गावातील महिला, पुरुष, युवक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
थोर पुरुषांचे दिले उदाहरण
या गावातील ग्रामस्थ, युवक, महिला यांच्याशी चर्चा करुन त्यांना संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जनकार्यांची उदाहरणे देऊन ग्रामविकास कसा करावा, याविषयीची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सिह यांनी ग्रामस्थांना दिली.
गावाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपण आपले ग्राम हागणदारी मुक्त केले पाहिजे. ‘स्वच्छतेतून समृध्दीकडे’ हा मंत्र सर्व ग्रामस्थांनी स्वीकारला पाहिजे. गावात स्वच्छता असेल तर त्या गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहते व गाव विकासाकडे वाटचाल करते. यासाठी सर्व ग्रामस्थांनी गावाच्या विकासाकरिता एकत्र येऊन ग्राम आदर्श करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- देवेंदर सिंह , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर.