शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जा !
By Admin | Updated: May 15, 2014 01:06 IST2014-05-15T01:06:21+5:302014-05-15T01:06:21+5:30
पर्यावरणाचे संरक्षण काळाची गरज असून दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे देशात प्रचंड उष्णता निर्माण होत असल्याचे संकेत मिळत असतानाच ..

शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जा !
राजुरा : पर्यावरणाचे संरक्षण काळाची गरज असून दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे देशात प्रचंड उष्णता निर्माण होत असल्याचे संकेत मिळत असतानाच राज्य शासनाने ग्रामपंचायतींमार्फत वृक्ष संवर्धनासाठी शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठय़ा थाटात जिल्हाभर राबविण्यात आला. मात्र या शतकोटी वृक्ष संवर्धन योजनेचा फज्जा उडाला आहे.
कोणत्याही ग्रामपंचायतीनी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली नाही. पावसाळा सुरू झाला की अनेक सामाजिक संस्था दरवर्षी झाडे लावतात. ती झाडे एक दोन महिने जिवंत राहतात आणि कालांतराने ती नाहिशी होतात. शासन दरवर्षी अनेक विभागामार्फत वृक्ष लागवडीचे काम हाती घेते. उन्हाळ्यामध्येच खड्डे खोदून ठेवले जाते. खड्डा खोदताना नियमानुसार खोदला जात नाही, जेवढे खड्डे असले पाहिजे तेवढे खोदण्यात येत नाही. पावसाळा सुरू झाला की झाडे लावण्याची लगबग सुरू होते. दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठय़ा थाटामाटात वृक्षदिंड्या काढल्या जातात. वृक्ष जगविण्याचा संदेश दिला जातो. सर्व शासनाचे प्रतिनिधी एकत्र येऊन झाडे लावतात. परंतु झाडे लावल्यानंतर जगतात किती, याची शहानिशा कुणीच करीत नाही. फक्त झाडे लावा परंतु ती झाडे कशी जगविता येईल, त्या झाडाला पाणी टाकणारी यंत्रणा कोण राबविणार, याचे काहीच नियोजन नसते. फक्त झाडे लावून राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हेच कार्य डोळ्यासमोर ठेऊन सर्व सामाजिक व राजकीय यंत्रणा वृक्ष संवर्धनाचे कार्य करीत असतात. राजुरा तालुक्यातील ६0 टक्के ग्रामपंचायतीमध्ये शतकोटी वृक्ष संवर्धन योजनेचा फज्जा उडाला आहे. वृक्ष लावल्यानंतर ते जागविण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. काही ग्रामपंचायतीच्या परिसरात रोपटे पडून पडून वाळून गेले. परंतु रोपटे लावण्यातच आले नाही. शासन योजना राबवित असतात. परंतु ढेपाळलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे सर्व योजना फोल ठरत आहे. जोपर्यंत योजनेची अंमलबजावणी योग्य तर्हेने होणार नाही, तोपर्यंत शासनाचा उद्देशही पूर्ण होणार नाही. सर्व योजना केवळकागदावरच राहतील, हे निश्चित. (शहर प्रतिनिधी)