सेंट्रल रेल्वे बळजबरीने खोदत आहे शेतातील माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:25+5:302021-04-15T04:27:25+5:30
विसापूर : विसापूर-नांदगाव पोडे शिवाराजवळ असलेल्या रेल्वे ट्रकलाईनवर भरण टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतजमिनीमधून कोणतीही पूर्वसूचना न देता बळजबरीने ...

सेंट्रल रेल्वे बळजबरीने खोदत आहे शेतातील माती
विसापूर : विसापूर-नांदगाव पोडे शिवाराजवळ असलेल्या रेल्वे ट्रकलाईनवर भरण टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतजमिनीमधून कोणतीही पूर्वसूचना न देता बळजबरीने सेंट्रल रेल्वे प्रशासन माती काढत आहे, असा आरोप स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते सूर्या अडबले यांनी केला आहे.
सेंट्रल रेल्वे प्रशासनाने मुजोरीने आपले काम सुरूच ठेवले आहे. या परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीला लागून रेल्वे विभागाचे सीमांकन केलेले पोल गाडलेले आहेत. त्या पोलपासून मातीचे खोदकाम न करता समोर त्यांच्या शेतातील माती जेसीबीने खोदली जात आहे. याबाबत प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदारांमार्फत या प्रकरणाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना पाचारण करेपर्यंत हे काम तात्पुरते बंद ठेवावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी करूनसुद्धा रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार आपले काम बंद ठेवयाला तयार नाहीत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. त्यांच्या शेतात मोठमोठे खड्डे केल्यामुळे जनावरे पडण्याची भीती निर्माण झालेली आहे. याकडे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा या अन्यायाबाबत तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिलेला आहे.