चंद्रपूरलगतच्या उद्योगांवर बंदीचे सावट

By Admin | Updated: December 28, 2015 01:30 IST2015-12-28T01:30:45+5:302015-12-28T01:30:45+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषत: चंद्रपूर परिसरातील अनेक उद्योग बंद होत असल्याने या उद्योगांमध्ये कामावर असलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

Censorship of Chandrapur Industries | चंद्रपूरलगतच्या उद्योगांवर बंदीचे सावट

चंद्रपूरलगतच्या उद्योगांवर बंदीचे सावट

कामगारांची उपासमार : पर्यावरण व उद्योग राज्यमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषत: चंद्रपूर परिसरातील अनेक उद्योग बंद होत असल्याने या उद्योगांमध्ये कामावर असलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. उद्योग बंद होत असताना या उद्योगांना पूर्ववत सुरु ठेवता यावे, यासाठी शासनस्तरावरुन धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. मात्र शासन स्तरावरुन कुठलीही मदत मिळत नसल्याने उद्योगांवर बंदीचे सावट आले आहे.
पर्यायाने या उद्योगांमध्ये कामावरील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. कामगार व उद्योगांची ही गंभीर अवस्था लक्षात घेता सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे महेश मेंढे यांनी राज्याचे पर्यायवरण व उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना प्रत्यक्ष भेटून केली व एका निवेदनाद्वारे परिस्थिती अवगत करुन दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत ना.पोटे यांनी सकारात्मक उत्तर देत उद्योगांवरील बंदीच्या सावटाबाबत सरकार लवकरच उपाययोजना करेल, अशी ग्वाही दिली. चर्चेदरम्यान महेश मेंढे यांनी प्रदूषणाच्या विषयावरील गंभीरताही मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून देत घुग्घुस शहरालगत असलेल्या कोल हॅण्डलिंग प्लान्टमुळे हजारो नागरिकांना श्वसन, खोकला, दमा यासारख्या अजाराने ग्रासले असून अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. यामुळे सदर कोल हॅण्डलींग प्लान्ट घुग्घुस शहराच्या बाहेर किमान पाच किंमी दूर नेण्यात यावा, अशी मागणीही मेंढे यांनी ना.प्रविण पोटे यांच्याकडे केली.
चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी कामगारांनी अनेकदा संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र संबंधित विभागाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे या उद्योगांना सुरु करण्यासाठी आपण संबंधित विभागांना निर्देश द्यावे व कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी महेश मेंढे यांनी यावेळी केली.
चंद्रपूर एमआयडीसीमध्ये सुरु असलेले निम्म्याकडून अधिक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे या उद्योगातील शेकडो कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे, याकडे मेंढे यांनी ना.प्रविण पोटे यांचे लक्ष वेधले.
यात वीजनिर्मिती प्रकल्पासह अन्य उद्योगांचाही समावेश आहे. गुप्ता पॉवर एनर्जी लि.उसेगाव, ग्रेस इंडस्ट्रीज, धारीवाल इन्फ्रा, सिद्धबली इस्पात, चमन मेटॅलिक आदी प्रमुख उद्योगांनाही बंदीचा फटका बसला असून येथील कामगार बेरोजगार झाले आहेत.
उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल शासन उपलब्ध करुन देण्यास असमर्थ ठरत असल्याने येथी उद्योजक त्रस्त झाले असल्याची माहितीही मेंढे यांनी ना. प्रविण पोटे यांना निवेदनातून दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Censorship of Chandrapur Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.