काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

By Admin | Updated: March 16, 2015 00:43 IST2015-03-16T00:43:26+5:302015-03-16T00:43:26+5:30

काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे चंद्रपूर मनपा नगरसेवकांनी तक्रार करून चंद्रपूर ...

Censor Debate Again | काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

चंद्रपूर : काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे चंद्रपूर मनपा नगरसेवकांनी तक्रार करून चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरक र यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नंदू नागरकर यांची निवड झाल्यापासून काँग्रेसचा गढ माणल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरात जनसमर्थन कमी झाले आहे. नागरकर यांची एककल्ली कारभार व हम करे सो कायदा या वृत्तीमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी आहे. सोबतच अध्यक्षपदाच्या तोऱ्यात नागरकर यांनी जनसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या विरोधात केलेल्या नौटंकबाज आंदोलनामुळे काँग्रेसच्या प्रतिमेला डाग लागला आहे, असे म्हटले आहे.
मनपा निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. पण त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर शहर व महानगर पालिका पक्षाला कधी नव्हे एवढे खाली यावे लागले. याची प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यातही दिसून आली.
नंदू नागरकर हे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून मिरवत असले तरी त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्ष धोक्यात आला आहे. त्यांनी यापुर्वी अनेकदा काँग्रेस पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविली आहे. चंद्रपूर मनपात महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहून स्वत:च्या स्वार्थासाठी नंदू नागरकर व महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव म्हणवून घेणाऱ्या सुनिता लोढीया यांनी जाहिररित्या शिवसेनेचे उमेदवार आकाश साखरकर यांना हात उंचावून उपमहापौर पदासाठी मतदान केले.
नागरकर हे आपल्या पदाचा गैरवापर करून शहरातील कोळसा व्यापारी, रेतीघाट ठेकेदार, लहान मोठे बिल्डर अशा अनेकांविरूद्ध तक्रारी करून त्यांना धमकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत चालली असून त्यांना पदावरून हटविण्याची मागणी माजी महापौर संगीता अमृतकर, सभागृह नेता संतोष लहागमे, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, नगरसेवक दुर्गेश कोडाम, अनिल रामटेके, मेहेर सिडाम, राजेश अड्डूर, सुभेदिया कश्यप, एस्तेर शिरवार, एकता गुरले, अजय खंडेवाल, एनएसयुआयचे अध्यक्ष कुणाल चहारे, पृथ्वी जंगम यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Censor Debate Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.