१५ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला पडल्या भेगा
By Admin | Updated: March 23, 2015 01:14 IST2015-03-23T01:14:57+5:302015-03-23T01:14:57+5:30
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूल शहरातून जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला अल्पावधीतच भेगा पडल्या आहेत.

१५ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला पडल्या भेगा
मूल : चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूल शहरातून जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला अल्पावधीतच भेगा पडल्या आहेत. १५ कोटी रुपये खर्च करून बँक आॅफ इंडिया ते पंचायत समितीपर्यंत सदर रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याच्या विस्तारासाठी १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अल्पावधीत भेगा पडल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला पुन्हा काम देण्यात येऊ नये, अशी नागरिकांची मागणी होत आहे.
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षभरापासून येथे १५ कोटी रुपयांच्या खर्चाचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील मूल शहरातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे नविन दिशा मिळाली असून शहराला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
१५ कोटी रुपयांमध्ये मूल शहरातील बँक आॅफ इंडिया ते पंचायत समितीपर्यंतच रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले. मात्र अर्धवट स्वरूपात रस्ता होत असल्याने तो वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी सतत ना. मुनगंटीवार यांच्याकडे केली. या मागणीला प्रतिसाद देत या कामासाठी १५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. कामाचे अंदाजपत्रक बनविण्याचे व प्रशासकीय मान्यतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी कोल्हापूरच्यावतीने करण्यात येत आहे. कामाचा दर्जा समाधानकारक असला तरी अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे काही दिवसात भेगाचे स्वरूप वाढणार असुन रस्त्याचा दर्जा खालवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नव्याने आलेल्या १५ कोटी रुपयांच्या कामासाठी अन्य कंपनीला काम देण्यात आल्यास कामाचा दर्जा समाधानकारक होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूलच्या नियंत्रणाखाली होत असलेल्या या सिमेंट काँक्रीट रस्त्याचा दर्जा कायम टिकविण्यासाठी स्पर्धा होणे महत्वाचे असुन स्पर्धेमध्ये दर्जा सुधारला जातो, असा अनुभव आहे. त्यामुळे १५ कोटी रुपयांच्या नविन कामासाठी कंत्राटदार बदलविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)