सीसीटीव्ही यंत्रणा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणार

By Admin | Updated: September 28, 2015 01:13 IST2015-09-28T01:13:07+5:302015-09-28T01:13:07+5:30

देशाच्या व राज्याच्या विकासात प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सज्जन शक्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत,

CCTV system will control crime | सीसीटीव्ही यंत्रणा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणार

सीसीटीव्ही यंत्रणा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणार

देशाच्या व राज्याच्या विकासात प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सज्जन शक्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत,बल्लारपूर : देशाच्या व राज्याच्या विकासात प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सज्जन शक्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर दुर्जन शक्तीसाठी कर्दनकाळ ठरणारी बाब आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा अस्तित्वात आला असून सीसीटीव्ही यंत्रणा गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणारी प्रभावी यंत्रणा म्हणून कर्तव्य बजावणार आहे, असे मत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
पोलीस ठाणे बल्लारपूरच्या वतीने शहरात २० महत्त्वाच्या ठिकाणी ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतून ४० लाख रुपये खर्च करून सर्व्हेलन्स यंत्रणेच्या उद्घाटनप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रल्हाद गिरी, पोलीस उपअधीक्षक (गृह) जसचंद काठे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, तहसीलदार डी.एस. भोयर, भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक नरूमणी तांडी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर पोलीस ठाणे अद्यावत करण्यात येणार आहे. ४० हजार फुटाच्या बांधकामासाठी १७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली असून नवीन स्वरूपातील पोलीस ठाणे आकारास येणार आहे. अन्य पोलीस ठाण्याच्या तुलनेत येथील ठाणे जिल्ह्यासाठी आदर्श ठरणारे आहे. बल्लारपूर ते बामणी (दुधोली) दरम्यान विद्युत व्यवस्थेसाठी ४ कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येथील बसस्थानकाचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही ते म्हणाले. सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा सुलभ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाला सुविधा पुरवणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बल्लारपूरचे ग्रामीण रुग्णालय, विसापूर व दुर्गापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबत जोडण्याचा संकल्प मुनगंटीवार यांनी जाहीर केला. आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहचविणार, असे आश्वासनही त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: CCTV system will control crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.