मासोळ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST2021-03-25T04:27:07+5:302021-03-25T04:27:07+5:30
ब्रह्मपुरी : स्थानिक लेंडारी तलावातील मृत झालेल्या मासोळ्यांना तलावातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून जोराचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तलावात ...

मासोळ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यातच
ब्रह्मपुरी : स्थानिक लेंडारी तलावातील मृत झालेल्या मासोळ्यांना तलावातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून जोराचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तलावात मृत झालेल्या मासोळ्यांचे प्रमाण अधिक असल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येत आहे. ही दुर्गंधी केव्हा जाणार, असा प्रश्न सदर तलावाच्या सभोवताल वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना पडला आहे. मासोळ्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
२० मार्चपासून या तलावातील मासे मृत्युमुखी पडायला सुरुवात झाली. दोन दिवसांनी सदर तलावाच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी आली आणि प्रशासनसुद्धा खडबडून जागे झाले. उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटनेते, न. प.चे आरोग्य निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित तलावाचे शुद्धीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगून सफाई कर्मचाऱ्यांना, शहरातील भोई समाजाला कामाला लावले. मात्र, चार दिवस लोटूनही दुर्गंधी कमी झाली नाही. मोठ्या प्रमाणात तलावात मासोळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामानाने सफाई कामगारांची संख्या तोकडी पडताना दिसत आहे.
जलपर्णींचा अडथळा
नगर परिषदेचे सफाई कामगार, बोटींचा आधार घेऊन तलावातील मृत मासे बाहेर काढून टाकत आहेत. मात्र, तलावाला मोठ्या प्रमाणात जलपर्णीने व्यापले असल्याने बोट चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर तलावातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. उष्णता असल्याने जलपर्णी सडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सफाई करताना अडचणी येत आहेत.