उमेदवारांचा होणार आज फैसला

By Admin | Updated: October 18, 2014 23:22 IST2014-10-18T23:22:42+5:302014-10-18T23:22:42+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची उद्या १९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी चंद्रपूर, मूल, चिमूर, ब्रह्मपुरी, राजुरा व वरोरा येथील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.

The candidates will be decided today | उमेदवारांचा होणार आज फैसला

उमेदवारांचा होणार आज फैसला

चर्वितचर्वणाला पूर्णविराम : मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची उद्या १९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी चंद्रपूर, मूल, चिमूर, ब्रह्मपुरी, राजुरा व वरोरा येथील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. जिल्ह्यात सहाही विधानसभा निवडणुकीत एकूण १०७ उमेदवार होते. यातील कोणता उमेदवार बाजी मारेल व कुणाला पराभव पत्कारावा लागेल, हे उद्याच्या मतमोजणीच स्पष्ट होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदार संघात एकूण १७ लाख ५० हजार ८९३ मतदार आहेत. यातील ६६. २६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी संपुष्टात आल्याने दोन्ही पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविले होते. भाजपा-शिवसेनेच्या युतीतही ताटातुट झाल्याने त्यांचेही स्वतंत्र उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक पक्ष स्वबळावर रिंगणात असल्याने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची यादी मोठी होती. प्रचाराला दिवस कमी असल्याने यावेळी प्रत्येक पक्षाने सर्व ताकदीनिशी प्रचारात उडी घेतली होती. १३ दिवस दमदार प्रचार करण्यात आला. खेड्यापाड्यातील मतदारापर्यंत उमेदवार पोहचू शकले नाही. मात्र त्यांचे निष्ठावान कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधला होता.
एकूण १७ लाख ५० हजार ८९३ मतदारांपैकी ११ लाख ६५ हजार ६०६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक ७४.८७ टक्के मतदान ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी ५४.०७ टक्के मतदान चंद्रपूर विधानसभा मतदार संघात नोंदविण्यात आले. याशिवाय राजुऱ्यात ७०.८० टक्के, बल्लारपूर विधानसभा ६३.१८ टक्के, चिमूर ७४.५५ टक्के व वरोरा विधानसभा क्षेत्रात ६४.८१ टक्के मतदान झाले. उद्या १९ आॅक्टोबरला जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी होणार आहे. अनेक दिग्गज रिंगणात असलेतरी केवळ सहा लोकांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार आहे.
कुणाच्या गळ्यात ही माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The candidates will be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.