एम्टाच्या नावे अनधिकृतपणे घेण्यात आलेला फेरफार रद्द करा
By Admin | Updated: January 18, 2016 01:01 IST2016-01-18T01:01:01+5:302016-01-18T01:01:01+5:30
आयुध निर्माण वसाहतीला लागून असलेल्या पिपरबोडी येथील निवासी प्लॉटचा अनाधिकृतपणे फेरफार करून ते प्लॉट कर्नाटक एम्टा कोल माईन्स लिमिटेड ...

एम्टाच्या नावे अनधिकृतपणे घेण्यात आलेला फेरफार रद्द करा
मागणी : ग्रामसभेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
भद्रावती : आयुध निर्माण वसाहतीला लागून असलेल्या पिपरबोडी येथील निवासी प्लॉटचा अनाधिकृतपणे फेरफार करून ते प्लॉट कर्नाटक एम्टा कोल माईन्स लिमिटेड बंगलोर यांच्या नावाने केला आहे. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून ते प्लॉट मुळ मालकांच्या नावे करण्यासाठी आदेश द्यावे, असा ठराव २० नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. त्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर फेरफार रद्द करा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सन २००७ मध्ये चेकबरांज साझ्यात कोळशाचे उत्खनन करण्यासाठी बंगलोर येथील कर्नाटका एम्टा कोल माईन्सला परवानगी देण्यात आली. यावेळी ५ जानेवारी २००८, ३० जानेवारी २००८ व ३१ जानेवारी २००८ नुसार या भागातील सर्व्हे नं. ८५/२, ८८/२ आणि ८६/२ ब यावरील प्लॉट कृषक दाखवून १९ आॅगस्ट २०१० च्या आदेशानुसार प्लॉटधारकाचे नाव नमुना ७/१२ वरुन कमी करून एम्टाच्या नावे २६ जुलै २०११ ला फेरफार घेण्यात आला. हा झालेला फेरफार कायदेशिर नसून प्लॉटधारकांवर अन्याय करुन बळजबरीने हिसकावून घेण्याचा प्रकार असल्याचा आरोप आहे. हा फेरफार करीत असताना प्लॉटधारकांना कोणत्याच प्रकारची सूचना किंवा पत्रव्यवहार करण्यात आला नाही. कर्नाटका एम्टाच्या नावाने झालेल्या फेरफारमुळे प्लॉटधारकात भितीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्व प्लॉटधारकांच्या नावाने फेरफार घेण्यात यावा व झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी, असा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. अन्यथा न्यायासाठी आंदोलन करण्यात येईल, प्रसंगी न्यायालयाची दारे ठोठावली जातील, असा इशारा देण्यात आला आहे. घेण्यात आलेल्या दुसऱ्या ठरावात सदर कोळसा खाण ही गावाला लागून असल्याने या गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. गावाचे पुनर्वसन प्रस्तावित असल्याने गावाच्या विकासासाठी शासनकडून मिळणारे अनुदान बंद आहे. त्यामुळे गावातील लोकांना आपल्या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)