डोंगरगाव प्रकल्पाचे कॅनल निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:38 IST2017-03-15T00:38:59+5:302017-03-15T00:38:59+5:30
मागील ३० वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या कॅनलचे काम सुरू करोडो रुपये खर्च होऊन सुद्धा शेतकऱ्यांना या कॅनलचे पाणी मिळू शकलेले नाही.

डोंगरगाव प्रकल्पाचे कॅनल निकृष्ट दर्जाचे
अंगलवार यांची तक्रार : तीन हजार शेतकरी सिंचनापासून वंचित
बी.यू. बोर्डेवार राजुरा
मागील ३० वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या कॅनलचे काम सुरू करोडो रुपये खर्च होऊन सुद्धा शेतकऱ्यांना या कॅनलचे पाणी मिळू शकलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाची चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य बी. एच. अंगलवार यांनी केली आहे.
डोंगरगाव कॅनलची पाच किलोमीटर पायी फिरून प्रत्यक्ष पाहणी केली असता, जुन्या कॅनलची दयनिय अवस्था झाली आहे. जिथून पाणी निघते, त्या कॅनलचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आढळले असून अनेक ठिकाणी कचरा भरलेला आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रीटचे कॅनल केल्यास त्याचा वापर योग्य होऊ शकते. दहा किलोमीटरवरच पाणी बरोबर येत नाही तर लांबवर असलेल्या धानोरापर्यंत पाणी येणार कसे, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
सद्या धानोरा-चिचोलीच्या जंगलात करोडो रुपये खर्च करून कॅनल तयार करण्यात येत आहे. पातळी समतोल राखण्यासाठी एक मोठा पूल तयार होत असून त्यामधून पाणी शेतकऱ्यांना देण्याचा अधिकाऱ्यांचा संकल्प आहे. परंतु या ठिकाणी पाणी येणे अशक्यच दिसून येत आहे. केवळ खर्च करायचे म्हणून हा प्रचंड खर्च केला जात आहे, असे अंगलवार यांनी म्हटले आहे.
डोंगरगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात तीन हजार शेतकरी असून जवळपास एक हजार एकर शेतीला त्याचा फायदा मिळणार होता. १०० करोडच्यावर येथे खर्च झाले. परंतु नियोजन बरोबर नसल्यामुळे अधिकाऱ्याच्या कासवगतीच्या कार्यप्रणालीमुळे मागील ३० वर्षापासून शेतकऱ्यांना पाणी मिळू शकलेले नाही.डोंगरगाव प्रकल्पाचे पाणी मुडीगेट, सुबई, बापूनगर, चिचोली, कीवठपेठ, धानोरा या गावांना मिळाले पाहिजे. परंतु धानोरा, चिचोली पर्यंत पाणी पोहचू शकलेले नाही. पुन्हा करोडो रुपये खर्च करून कॅनलचे काम सुरू झाले. त्यामुळे खरच पाणी येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भेंडाळा प्रकल्पही
दयनीय अवस्थेत
डोंगरगाव प्रकल्पाप्रमाणेच भेंडाळा सिंचन प्रकल्पाची स्थिती अतिशय दयनिय आहे. याठिकाणी सुद्धा करोडो रुपये खर्च झाले. मात्र हा प्रकल्प सुद्धा थंडबस्त्यात आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध होणे आवश्यक आहेत. या सिंचन प्रकल्पावर झालेल्या खर्चाची चौकशी करून संबंधितांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्याची मागणी बी.एच. अंगलवार यांनी केली आहे.