बल्लारपूर पोस्टाचा परिसर झाड-फुलांनी बहरला
By Admin | Updated: August 26, 2016 00:55 IST2016-08-26T00:55:48+5:302016-08-26T00:55:48+5:30
कर्मचाऱ्यांमध्ये कल्पना, आपण ज्या कार्यालयात काम करतो, तो परिसर देखणा सुंदर असावा, याकरिता त्यांची आवड व धडपड

बल्लारपूर पोस्टाचा परिसर झाड-फुलांनी बहरला
डेरेदार वृक्ष : कर्मचाऱ्यांच्या कल्पना शक्तीचा अविष्कार
बल्लारपूर: कर्मचाऱ्यांमध्ये कल्पना, आपण ज्या कार्यालयात काम करतो, तो परिसर देखणा सुंदर असावा, याकरिता त्यांची आवड व धडपड आणि त्याकरिता हातात घेतलेल्या कामात सर्वांचा सहभाग, सातत्य असले की, तो परिसर कसा फुलते, बहरतो आणि येणाऱ्या प्रत्येकाला तो कसा प्रफुल्लत करतो, याचे चांगले उदाहरण बल्लारपूर येथील पोस्टाचा झाड- फुलांनी बहरलेला परिसर आहे.
बल्लारशाह रेल्वे स्टेशन मागे, चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावरील हे पोस्ट आॅफीस स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. चारही बाजूंनी भिंत असलेला पोस्ट आॅफीसचा परिसर खुप मोठा आहे. या मोकळ्या जागेला शोभिवंत झाड व फुलांनी बहरविण्याची कल्पना १५-१६ वर्षापूर्वी तत्कालीन पोस्टमास्तर कुंभारे आणि त्यांचे सहकारी राजू धानफुले, रमा यांच्या मनात आली.
या कल्पनेला मूर्तरुप देण्याकरिता त्यांनी चंद्रपूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून या कामी मदत मागितली. या कल्पक व चांगल्या कामाला सर्वांकडून मदत मिळून परिसर झाडा-फुलांनी बहरविण्याच्या कामाला सुरुवात झाली.
परिसरात विहीर असून पाण्याची चांगली सोय आहे. कर्मचारी या वृक्षवेलींची काळजी घेतात. यामुळे भर उन्हाळ्यातही हा परिसर हिरवागार आणि निरनिराळ्या फुलांच्या रंगानी बहरलेला असतो. या सोबतच, छाया देणारे डेरदार वृक्षही आहेत. रस्त्याच्या दोन्ही कडेला मेहंदीची झाडं आणि परिसर स्वच्छ असल्यामुळे या कार्यालयाच्या परिसरात प्रसन्नता मिळते.
वृक्षांना मुबलक पाणी आणि त्यांची योग्य निगा, यामुळे हिवाळा- उन्हाळ्यात ही झाडे-फुले टवटवीत असतात. श्रावण हा तर हिरव्या श्रीमंतीचा महिना असतो. त्यामुळे या घडीला हा परिसर हिरव्या नवलाईने मोहक फुलांनी न नटला तर नवलच! (तालुका प्रतिनिधी)