अर्धांगिनीही गुंतल्या प्रचारात

By Admin | Updated: October 11, 2014 01:32 IST2014-10-11T01:32:48+5:302014-10-11T01:32:48+5:30

चिमूर मतदार संघात काँग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, बसपा व मनसेमध्ये लढत असल्याने या मतदार संघाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

In the campaign involving Ardhangini | अर्धांगिनीही गुंतल्या प्रचारात

अर्धांगिनीही गुंतल्या प्रचारात

राजकुमार चुनारकर खडसंगी
चिमूर मतदार संघात काँग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, बसपा व मनसेमध्ये लढत असल्याने या मतदार संघाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आपलाच माणूस निवडून यावा यासाठी उमेदवाराच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य झटत असून सारेच प्रचारासाठी घराबाहेर पडले आहेत. घरातील दैनंदिन जबाबदारी पार पाडत उमेदवारांच्या अर्धांगिनीने पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचार सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात पहायला मिळत आहे.
पूर्वीच्या काळात स्त्रीला चूल आणि मूल यापलिकडे जाता येत नव्हते. मात्र महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करण्यास सुविधा मिळत आहे. त्यामुळे आजची महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रीचा हात असतो, ही गोष्ट सर्वश्रृत आहे. भारतीय संस्कृतीत विवाहानंतर पती- पत्नीचे नाते हे प्रेमाने भरले जाते. पत्नी ही पतीच्या सुख दु:खाची भागीदारी बनून पतीच्या दु:खातही ती पुढे उभी राहते. काही महिला आर्थिक परिस्थितीनुसार काबाडकष्ट करुन परिवाराचा गाडा चालविण्यास मदत करतात. आज मात्र निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक महिला आपले पती निवडणूक जिंकावे, याकरिता घरचे काम आटोपून पतीच्या प्रचाराची धुरा पतीच्या खांद्याला खांदा लावून सांभाळत आहेत.
भारतीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. अविनाश वारजूकर यांच्या अर्धांगीनी वृंदा अविनाश वारजूकर, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अर्धांगीनी अपर्णा किर्तीकुमार भांगडिया तर शिवसेनेचे उमेदवार गजानन बुटके यांच्या अर्धांगीनी सीमा गजानन बुटके या तिन्ही अर्धांगीनी घरची कौटुंबिक जबाबदारी पार पाडीत पतीला निवडणुकीत विजयी व्हावे याकरीता महिला कार्यकर्त्यांना घेऊन गावागावात पदयात्रा काढून पतीच्या प्रचारात सिंहाचा वाटा उचलत आहेत. प्रत्येक उमेदवाराची अर्धांगीनी पतीच्या सामाजिक व राजकीय कार्याची महती सांगून विकास कामाचा जागर करीत आपल्या पतीला निवडून देण्याकरिता मताचा जोगवा मागत पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करीत आहे. तथा या उमेदवाराच्या कुटुंबियांचे सदस्य प्रचारामध्ये सहभाग घेऊन कार्यकर्त्यांशी समन्वय साधून प्रचार करीत आहे.

Web Title: In the campaign involving Ardhangini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.