जलयुक्तच्या कामासाठी घेतलेल्या रकमेत सावळागोंधळ
By Admin | Updated: June 22, 2015 01:15 IST2015-06-22T01:15:47+5:302015-06-22T01:15:47+5:30
राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतात केली जात आहे.

जलयुक्तच्या कामासाठी घेतलेल्या रकमेत सावळागोंधळ
वरोरा : राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतात केली जात आहे. निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांकडून शेतात जलयुक्त शिवाराचे काम करण्याकरिता शासनाने निर्धारित केलेली रक्कम घेतली जात आहे. परंतु याबाबत पावती दिली जात नसल्याने या रकमेचे पाणी कुठे मुरणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
जलयुक्त शिवार योजनेमधून युद्धस्तरावर शेतात कामे केली जात आहे. यामध्ये बोडी खोलीकरण, बांध्या नूतनीकरण, शेततळे बांध टाकणे आदी कामे केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम मोजावी लागते. या कामाचे प्रारंभी अंदाजपत्रक तयार करून त्या तुलनेत पाच व दहा टक्के रक्कम घ्यावी लागते. परंतु अनेक ठिकाणी काम करताना शेतकऱ्यांना त्या कामाचे अंदाजपत्रक दाखविले जात नसल्याचे समजते व अनामत रक्कम घेतली जात आहे. यामध्ये कुठल्याही नावाने पावती दिली जात नसल्याने ही रक्कम पानलोट विकास समिती खात्यात पूर्णपणे जाते काय, याबाबत शेतकरी शंका उपस्थित करीत आहे. सारखेच काम असताना रक्कम घेताना अनेक ठिकाणी तफावती दिसून येतात.