करवाढीच्या विरोधात व्यावसायिकांचा एल्गार

By Admin | Updated: March 19, 2017 00:36 IST2017-03-19T00:36:31+5:302017-03-19T00:36:31+5:30

माजरी ग्रामपंचायत प्रशासनाने करामध्ये दुप्पट वाढ केल्याचा विरोध व आठवडी बाजाराचा करण्यात येणारा लिलाव...

Businessman's Elgar Against Tax Increases | करवाढीच्या विरोधात व्यावसायिकांचा एल्गार

करवाढीच्या विरोधात व्यावसायिकांचा एल्गार

माजरी येथील प्रकार : व्यावसायिकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन, लिलाव प्रक्रिया रद्द,
भद्रावती : माजरी ग्रामपंचायत प्रशासनाने करामध्ये दुप्पट वाढ केल्याचा विरोध व आठवडी बाजाराचा करण्यात येणारा लिलाव यासंदर्भातील निवेदन व्यावसायिकांने जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. व करामध्ये वाढ करुन नये, यासाठी व्यावसायिकांनी ग्रामपंचयात कार्यालयावर धडक दिली. त्यामुळे प्रशासनाने माघार घेत ही लिलाव प्रक्रिया स्थगित केली.
भद्रावती तालुक्यातील माजरी येथे आठवडी बाजार तसेच दैनंदिन बाजार भरतो. यामध्ये फळभाज्या विक्रेते, मटण-चिकन विक्रेते, फेरीवाले, रेडिमेड कपडा दुकान, दुकानदार तसेच अन्य किरकोळ विक्रेते आपली दुकाने थाटून व्यवसाय करीत आहेत. ग्रामपंचायतीद्वारे या बाजाराचे कंत्राटीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात याची लिलाव प्रक्रिया पूर्ण होणार होती. यामध्ये पूर्वीच्या तुलनेत व्यावसायिकांकडून दुप्पट कर वसुल करण्यात येणार होता. याबाबतची माहिती व्यावसायिकांना लागताच त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे धाव घेतली. व वाढविण्यात येणाऱ्या कराचा विरोध केला.
पूर्वीच आर्थिक परिस्थिती बेताची असून वाढविण्यात आलेला कर भरायचा तरी कुठून असा सवाल यावेळी व्यावसायिकांनी केला. तसेच कंत्राटदाराकडून बळजबरीने कर वसुल केला जातो. या दरम्यान अनेकदा वाद होत असताना दिसून येते.त्यामुळे वाढीव करवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच तसेच सचिव यांची उपस्थिती होती. या लिलाव प्रक्रियेला विरोध दर्शविल्यानंतर अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने नमते घेत ही लिलाव प्रक्रिया स्थगित केली. प्रशासनाने याची त्वरित दखल घेत हा कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
विरोध करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये अब्दुल वहाब, श्रीराम खैरे, कुलीन हिकरे, इलियास, हरिश्चंद्र गुप्ता, शालू भोयर, इरसिला उईके, पप्पू गुप्ता, अरुण चांदेकर, नसीम भाई, विनोद खस, गुलाम नबी, तेजबहादूर, गोविंद हिकरे, मनोज खैरे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

बाजार परिसरात असुविधा
बाजार परिसरात अनेक सुविधांचा अभाव आहे. महिलाकरिता येथे शौचालय नाही, पाणी पिण्याची सुविधा, पथदिवे, टिनचे शेड अशा मूलभूत सुविधांची येथे वानवा आहे. सोबतच मोकाट जनावरांचा मुक्तसंचार यामुळे येथील बाजार परिसर प्रभावित होत असतो. मात्र, या सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे.

Web Title: Businessman's Elgar Against Tax Increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.