सात संस्थाचालकांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा दणका

By Admin | Updated: February 22, 2017 00:44 IST2017-02-22T00:44:49+5:302017-02-22T00:44:49+5:30

विश्वस्त संस्थांचे लेखा अहवाल आणि फेरफार नोंदीसाठी गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम राबवूनही प्रतिसाद न देणाऱ्या ...

A bunch of charity commissioner's office on seven executives | सात संस्थाचालकांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा दणका

सात संस्थाचालकांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा दणका

नोंदणी रद्द : अनुदान थांबविण्याचे आदेश
चंद्रपूर : विश्वस्त संस्थांचे लेखा अहवाल आणि फेरफार नोंदीसाठी गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम राबवूनही प्रतिसाद न देणाऱ्या जिल्ह्यातील सात संस्थांना सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाने पहिला दणका दिला आहे. या सात संस्थांची नोंदणी रद्द करून त्यांचे अनुदान थांबविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
बल्लारपूर येथील प्रियदर्शनी एज्युकेशन सोसायटी, जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ नेरी (ता. चिमूर), स्वातंत्र्यविर सावरकर ज्ञान प्रसारक मंंडळ मूल, गुरूकुल बहुउद्देशिय संस्था मूल, श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ तांबेगडी (ता. सिंदेवाही), चंद्रपूर डिस्ट्रिक स्माल स्केल इंडस्ट्रिस असोसिएशन चंद्रपूर आणि चंद्रपूर इंजिनिअरिंग असोसिएशन चंद्रपूर अशी या संस्थांची नावे आहेत.
महाराष्ट्र विश्वस्त संस्था अधिनियन १९५० च्या कलम २२ (३ अ) नुसार चौकशी पूर्ण केल्यावर ही नोंदणी रद्दबादलाची कारवाई करण्यात आली आहे. मागील पाच वर्षे व त्या पेक्षाही अधिक काळापासून संस्थेचे लेखा अहवाल सादर न करणे, चौकशीच्या कामी हजर न राहणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे या कार्यालयाने कळविले आहे. या संस्थांना समाजकल्याण विभाग अथवा शिक्षण विभागाकडून निधी मिळत असल्यास तो थांबविण्याचे आदेशही सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत.
ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. मागील महिन्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात या मोहिमेसाठी विशवस्त संस्थांना आवाहन करून राज्यात विशेष अभियान राबविण्यात आले होते. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळाला होता. असे असले तरी राज्यात अनेक संस्थांकडून ही प्रक्रिया सुरू असल्याने या योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्यात हिशेब सादर न करणाऱ्या संस्थांवर संस्था रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावले जात आहेत.
यामुळे गेल्या दिड महिन्यापासून या कार्यालयात संस्थाचालकांची आणि पदाधिकाऱ्यांची गजबज वाढली आहे. एकाच वेळी सात संस्थांची नोंदणी रद्द करण्याच्या या निर्णयामुळे विश्वस्त संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बरीच खळबळ निर्माण झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

लेखा अहवाल सादर न करणाऱ्या संस्थांवर नोटीस बजावण्यात आले आहेत. अशा संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी संबंधित तारखेला कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. ही कारवाई नियमानुसारच झाली असून यापुढेही सुरू राहणार आहे. संस्थाचालकांनी चौकशीत सहभाग घ्यावा आणि या मोहिमेची गांभीर्याने दखल घ्यावी.
- आर. एन. चव्हाण
धर्मदाय आयुक्त ०१, चंद्रपूर

Web Title: A bunch of charity commissioner's office on seven executives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.