बैलगाडी घोटाळ्याची चौकशी
By Admin | Updated: October 15, 2015 01:12 IST2015-10-15T01:12:25+5:302015-10-15T01:12:25+5:30
अंगणवाडीतील बालके व गरोदर महिलांना जिल्हा परिषदेतर्फे घरपोच टीएचआर पोषण आहार योजनेमध्ये काही ठिकाणी पुरवठ्यात अळ्या, ..

बैलगाडी घोटाळ्याची चौकशी
टीएचआर घोटाळा : लोखंडी बंडी घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचणार
चंद्रपूर : अंगणवाडीतील बालके व गरोदर महिलांना जिल्हा परिषदेतर्फे घरपोच टीएचआर पोषण आहार योजनेमध्ये काही ठिकाणी पुरवठ्यात अळ्या, सोंडे सापडल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी टीएचआर पुरवठ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. लहान मुले व गरोदर मातांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोखंडी बंडी गैरव्यवहार व टीएचआर पोषण आहार गैरव्यवहार हे मुद्दे गाजत असून संध्या गुरुनुले यांना लक्ष करून विरोधक आरोप करीत आहे. या आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, जि.प. सदस्य विनोद अहिरकर व सतीश वारजूकर यांची पत्रकबाजी गंभीरपणे घेण्याची गरज नाही. त्यांच्या अशा कार्यपद्धतीमुळे त्यांच्याच पक्षाचे किती सदस्य त्यांच्यावर विश्वास ठेवतात, हा संशोधनाचा प्रश्न आहे. प्रश्न उपस्थित करायचे व नंतर पुरवठाधारकांसोबत हितसंबंध जोडायचे, अशी आमची संस्कृती नाही. योजनेअंतर्गत गैरव्यवहार होत असले तर ही गंभीर बाब असून याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे मला वाटते.
विनोद अहीरकर व सतीश वारजूकर यांनी टीएचआर मुद्दा वर्तमानपत्रात मांडल्यानंतर दोन दिवसानंतर होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सदर मुद्दा उपस्थित करण्याची गरज होती. लोखंडी बंडी गैरव्यवहारासंबंधाने सभेमध्ये मुद्दा उपस्थित होईल व त्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे चर्चेमध्ये सहभाग टाळण्यासाठी अध्यक्ष महोदय त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, असा क्षुल्लक मुद्दा उपस्थित करून सभेमधून त्यांनी पलायन केले. लोखंडी बंडी घोटाळ्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतच चौकशीचे आदेश दिल्यानंतर व त्यापूर्वीसुद्धा वर्तमानपत्रातून घोटाळ्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना लोखंडी बंडीचे देयके पुरवठाधारकास अदा करण्यात आल्याची बाब स्थायी समितीसमोर आली. तेव्हा सर्वच सदस्य अचंबित झाले. त्यामुळे जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले. बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा जनतेच्या कल्याणाची कामे करावी, असा सल्ला विनोद अहिरकर व सतीश वारजूकर यांना अध्यक्षांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)