बुलडोजरने कामगाराला चिरडले
By Admin | Updated: June 11, 2014 23:50 IST2014-06-11T23:50:30+5:302014-06-11T23:50:30+5:30
जीएमआर एमको कंपनीच्या आवारात रात्री बुलडोजर मशीनने काम करीत असताना बाजुला झोपलेल्या कामगारवरुन बुलडोजर गेल्याने एक २२ वर्षीय कामगार चिरडला गेला. रात्रीच संबंधित अधिकाऱ्यांनी

बुलडोजरने कामगाराला चिरडले
वरोरा: जीएमआर एमको कंपनीच्या आवारात रात्री बुलडोजर मशीनने काम करीत असताना बाजुला झोपलेल्या कामगारवरुन बुलडोजर गेल्याने एक २२ वर्षीय कामगार चिरडला गेला. रात्रीच संबंधित अधिकाऱ्यांनी जखमी कामगारास तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले. ही घटना माहिती होताच कामगार व नजीकच्या ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
जीएमआरएमको ही ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी वरोरा नजीकच्या मोहबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत आहे. १० जून रोजी वरोरा तालुक्यातील निमसडा गावातील २२ वर्षीय महेंद्र अनिल खंडाळकर हा कामगार रात्री पाळीत काम करण्याकरिता कंपनीच्या आवारात आला. महेंद्र कंपनीतील एका कंत्राटदाराकडे काम करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. रात्री कंपनीच्या आवारात माती पसरविण्याचे काम बुलडोजरने सुरू होते. त्याच परिसरात महेंद्र झोपला होता. महेंद्र झोपला असल्याचे बुलडोजर चालक सुरेश कामडी यांच्या लक्षात आले नसल्याने बुलडोजर महेंद्रच्या अंगावरुन गेला. पहाटेच महेंद्रचा मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
कंपनीच्या आवारात अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची वार्ता कामगारात व परिसरातील गावात माहित होताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात कामगारांनी चांगलीच गर्दी केली होती. जोपर्यंत दोषीवर कारवाई व मृताच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ मिळत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका उपस्थितांनी घेतल्याने काही काळ तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बुलडोजरचा चालक सुरेश कामडी याच्याविरुद्ध हयगय करून बुलडोजर चालविल्याप्रकरणी व सदर कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असल्याने कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे. मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तणावाची स्थिती निवळली. उल्लेखनीय असे की काही दिवसांपूर्वी कामगार सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर कंपनीच्या आवारातच कामगाराचा मृत्यू झाल्याने कामगाराची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)