दुसऱ्या दिवशीही चालला बुलडोजर
By Admin | Updated: December 30, 2016 01:39 IST2016-12-30T01:39:59+5:302016-12-30T01:39:59+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरातील अनधिकृत ठरविण्यात आलेली धार्मिक स्थळे

दुसऱ्या दिवशीही चालला बुलडोजर
चंद्रपुरात मोहीम : पाच अतिक्रमित धार्मिक स्थळे भुईसपाट
चंद्रपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरातील अनधिकृत ठरविण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम चंद्रपूर मनपा प्रशासनाकडून बुधवारपासून सुरू आहे. गुरूवारी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही पाच अनाधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोजर चालवून भुईसपाट करण्यात आले. दरम्यान दे. गो. तुकूम येथील सत्वाचा मारोती मंदिर हटविताना काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत दिवसभरात तुकूम परिसरातील पाच अनधिकृत धर्मस्थळांना भूईसपाट करण्यात आले. यामध्ये निर्माणनगरातील मातामंदिर, राधाकृष्ण मंदिर, वैद्यनगरातील माता मंदिर, दे.गो. तुकूम येथील नाग मंदिर व सत्वाचा मारोती मंदिराचा समावेश आहे.
सकाळपासून कारवाई सुरू असताना सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सत्वाचा मारोती मंदिर येथे मनपाचे वरिष्ठ अधिकारी, बुलडोजर, अग्नीशामक दलाचे वाहन, सफाई कर्मचारी, पोलीस शिपाई, वाहतूक पोलीस दाखल झाले. यावेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली.
त्यामुळे पोलिसांनी एका बाजुची वाहतूक वळवून रस्ता बंद केला. यामुळे दुर्गापूरकडे जाणाऱ्या-येणाऱ्यांना वाहन काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, दुर्गापूरचे ठाणेदार सिंगनजुडे यांच्यासह मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त डॉ. विजय इंगोले व अन्य मनपा अधिकारीही घटनास्थळी हजर होते. दरम्यान, मंदिरासमोर सभामंडप टाकून महिला व पुरूष मंदिर हटविण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बसले होते. मंदिर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर मंदिर पाडण्याची कारवाई करण्यात आली.
सायंकाळनंतर ही कारवाई थांबली असली तरी, उद्या शुक्रवारीही सकाळीपासूनच अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वारित अनधिकृत धर्मस्थळे शुक्रवारीच्या अतिक्रमण हटाव कारवाईत भुईसपाट होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
चर्चेनंतर कारवाई करण्यास होकार
सत्वाचा मारोती मंदिर पाडताना नागरिकांचा मोठा जमाव निर्माण झाला होता. मंदिर कमिटी व इतर नागरिकांचा रोष पाहता मनपा आयुक्त काकडे व अन्य अधिकाऱ्यांनी मंदिर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर अतिक्रमण हटविण्यास सदस्यांनी होकार दिला. त्यांनीच मंदिर कमिटीच्या अन्य सदस्यांना ध्वनीक्षेपकाद्वारे पालिका प्रशासनाला कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे अतिक्रमण हटाव पथकाने दोन तासानंतर मंदिर पाडण्याची कारवाई केली.