बल्लारपुरात झोपड्यांवर चालला बुलडोजर
By Admin | Updated: April 8, 2016 00:54 IST2016-04-08T00:54:07+5:302016-04-08T00:54:07+5:30
बल्लारपूर तहसील अंतर्गत विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत महसूलच्या जागेवर भिवकुंड परिसरात अनेकांनी अनधिकृत झोपड्या तयार केल्या.

बल्लारपुरात झोपड्यांवर चालला बुलडोजर
बल्लारपूर तहसीलची कारवाई : पक्के बांधकाम पाडण्यासाठी आग्रह
बल्लारपूर : बल्लारपूर तहसील अंतर्गत विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत महसूलच्या जागेवर भिवकुंड परिसरात अनेकांनी अनधिकृत झोपड्या तयार केल्या. शासकीय जमिनीवर अतिक्रमण हटवित झोपड्यांवर बुलडोजर चालविला. ही कारवाई गुरुवारी दुपारी १.३० वाजता तहसील प्रशासनाने केली. दरम्यान या ठिकाणी पक्के बांधकाम उदध्वस्त करण्यात यावे म्हणून नागरिकांनी तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेराव केला. दोन दिवसात पक्के बांधकाम जमिनदोस्त करण्याचे आश्वासन तहसीलदार विकास अहीर यांनी दिले आहे.
बल्लारपूर तलाठी साज्यातील सर्व्हे क्रमांक १०५ च्या जागेवर काही दिवसांपासून एका इसमाने अवैधरित्या अतिक्रमण करुन जागा बळकावण्याचा प्रयत्न चालविला होता. माझीच जागा म्हणून नोटरी करुन विकण्याचा गोरखधंदा सुरु केला होता. याचा सुगावा विसापूर येथील नागरिकांना लागला. या इसमाचा बेत उधळून लावण्यासाठी विसापूर येथील नागरिकांनी अतिक्रमण करुन झोपड्या उभारल्या. विसापूरच्या हद्दीतील जागा विसापूरकरांना घरे बांधण्यास मिळावी म्हणून गावातील ५० हून अधिक नागरिकांनी सदर जागेवर अतिक्रमण करण्यास आठ दिवसांपासून सुरुवात होती.
सर्व्हे क्र. १०५ च्या जागेवर अतिक्रमणधारकांची संख्या वाढत गेल्याने महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन तक्रारीने जर्जर झाले. या संदर्भात उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांच्या आदेशान्वये तहसील प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावली. यातील काहीने महसूल प्रशासनाला सहकार्य करुन अतिक्रमण काढून सहकार्य केले. मात्र काहींनी प्रशासनाच्या नोटीसला न जुमानता अतिक्रमण कायम ठेवले. परिणामी महसूल प्रशासनाने पोलिसांचा ताफा घेवून अतिक्रमणधारकांच्या झोपड्यावर बुलडोजर चालविला.
दरम्यान, संस्थेचे नाव पुढे करुन व सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या व जागा हडपण्याच्या बेतात असलेल्या इसमाचे तेथील पक्के बांधकाम आजच्या कारवाईत कायम ठेवल्याने गावकऱ्यांत नाराजी निर्माण झाली. तहसील प्रशासनाने पक्के बांधकाम हटविण्यास दिरंगाई केल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)