२,२०० रुपये किमतीचे बल्ब ६, ५०० रुपयांत

By Admin | Updated: December 4, 2015 01:23 IST2015-12-04T01:23:17+5:302015-12-04T01:23:17+5:30

तालुक्यातील म्हसली गट ग्रामपंचायतीअंतर्गत मासिक सभेत ठराव न घेता एलईडी बल्ब स्वत: खरेदी करुन पर्यावरण ग्राम संतुलीत योजनेच्या फंडातील रकमेची ...

Bulbs worth Rs 2,200 are priced at Rs 6,500 | २,२०० रुपये किमतीचे बल्ब ६, ५०० रुपयांत

२,२०० रुपये किमतीचे बल्ब ६, ५०० रुपयांत

म्हसली ग्रामपंचायीतील प्रकार: एलईडी बल्ब खरेदीत हेराफेरी
नागभीड: तालुक्यातील म्हसली गट ग्रामपंचायतीअंतर्गत मासिक सभेत ठराव न घेता एलईडी बल्ब स्वत: खरेदी करुन पर्यावरण ग्राम संतुलीत योजनेच्या फंडातील रकमेची हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप उसरपंच मारोती ठाकरे यांनी केला आहे.
म्हसली गटग्रामपंचायतीची सप्टेंबर महिन्यात पहिली मासिक सभा घेण्यात आली. या सभेमध्ये खरेदी करावयाच्या कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही व तसा ठरावही करण्यात आला नाही. मात्र आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या मासिक सभेत ग्रामसेविका ए.आर.भोयर, यांनी एकूण ९५ हजार रुपयांचे १५ नग एलईडी बल्ब खरेदी करण्यात आले म्हणून सांगितले. या सभेत खरेदी केल्याचे बिल, कोटेशन व बल्बसुद्धा दाखविण्यात आले नाहीत. ही खरेदी ऐकून सर्व सदस्य आश्चर्यचकीत झाले. या बल्बची किंमत अंदाजे २६०० पेक्षा जास्त नसावी. सायंकाळ झाल्याने सभा लवकरच गुंडाळण्यात आली. सोबतच मासिक सभेमध्ये सर्व सदस्यांचे उपस्थिती रजिस्टर असते. परंतु उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षऱ्या न घेता सरळ सरळ प्रोसीडींग रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्यात. या सभेच्या आठ दिवसानंतर खरेदी केलेल्या १५ नग बल्बपैकी प्रत्यक्ष १३ नग बल्ब तेलीमेंढा व म्हसली गावासाठी पाठविले. उल्लेखनीय असे की, आॅगस्ट १५ मध्येच २८ हजारांची बल्ब खरेदी दाखविण्यात आली आहे.
सदर ठराव नोव्हेंबरच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते नामंजूर करण्यात आला असून ग्रामसेविकेने स्वत: सर्व सदस्यांना विश्वासात न घेता बल्ब खरेदी केले असल्याचा आरोप आहे. हा प्रकार नियमबाह्य असून पर्यावरण ग्राम संतुलीत योजनेच्या रकमेची अफरातफर आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी करुन सदर रक्कम ग्रामपंचायतीला जमा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bulbs worth Rs 2,200 are priced at Rs 6,500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.