परवाना शुल्क वाढीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत
By Admin | Updated: November 5, 2015 01:29 IST2015-11-05T01:29:05+5:302015-11-05T01:29:05+5:30
गौण खनिजांच्या वाहतुक परवाना शुल्कात आणि दंडात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने गौण खनिज वाहतुकदारांचे

परवाना शुल्क वाढीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत
नागभीड : गौण खनिजांच्या वाहतुक परवाना शुल्कात आणि दंडात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची वाहणे उभी असल्याने त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न तर निर्माण झालाच आहे पण त्याचबरोबर वाहनांची किस्त भरण्याचेही वांदे आले आहेत.
नागभीड तालुका हा उद्योग विरहीत तालुका आहे. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या शेकडा ९० टक्के तरुणांना बेकारीचेच जीवन जगावे लागते. यावर उपाय म्हणून काही तरुणांनी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करून गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला होता. यात काहींनी जमही बसवला होता. मात्र मागील तीन महिन्याअगोदर रेती, मुरुम आणि इतर गौण खनिजांच्या वाहतूक परवान्यात शासनाने मोठ्या प्रमाणावर वाढ केल्याने संपूर्ण बजेटच बिघडून गेले आहे.
मागील वर्षी ज्या १०० फुट (एक ब्रॉस) रेतीचा परवाना ४०० होता, तो परवाना शुल्क आता ८०० रुपये करण्यात आला आहे. मुरुम २०० रुपये होता तो आता ४०० रुपयावर नेऊन ठेवण्यात आला आहे. गिट्टीसुद्धा २०० ची ४०० रुपये करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकदारांचे कंबरडेच मोडले आहे. यावर उपाय म्हणून काही वाहतुकदारांनी लपूनछपून हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दंडाची आकारणीही करण्यात आली आहे. शासनानेच या दंडात विक्रमी वाढ केली आहे.
पूर्वी एखाद्या व्यावसायिकाने अवैध वाहतूक केली तर १०० फुट रेती-गिट्टीवर ३२०० रूपये दंड आकारण्यात येत होता. आता यात वाढ करून तो ५४०० रूपये करण्यात आला आहे. हीच अवैध वाहतूक रात्रीच्या वेळी पकडण्यात आली तर या दंडाचे वेगळेच ‘रेट’ असल्याची माहिती आहे. वाढविण्यात आलेला परवाना शुल्क आणि दंडामुळे या तालुक्यातील वाहतुकदार अडचणीत आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
परवाना शुल्क वाढीमुळे केवळ वाहतूकदारच अडचणीत आले, असे नाही तर सर्व सामान्यांनाही याचा फटका बसत आहे. अनेकांच्या घरांचे बांधकाम थांबले आहे. अनेकांचे बजेट बिघडले आहे. बांधकाम व्यवसायात असलेल्या लोकांवर बेकारी ओढवली आहे.
- रवी आंबोरकर,
माजी उपसरपंच, नागभीड