बांधकाम सभापतीकडून युवकास मारहाण
By Admin | Updated: August 29, 2016 01:21 IST2016-08-29T01:21:41+5:302016-08-29T01:21:41+5:30
येथील नगर पंचायतीचे बांधकाम सभाती राकेश पून यांनी उधारीचे पैसे न दिल्याच्या संतापातून एका तरुणाला मारहाण केली.

बांधकाम सभापतीकडून युवकास मारहाण
गोंडपिंपरी नगर पंचायत : पोलिसात तक्रार; कारवाईस मात्र विलंब
गोंडपिपरी : येथील नगर पंचायतीचे बांधकाम सभाती राकेश पून यांनी उधारीचे पैसे न दिल्याच्या संतापातून एका तरुणाला मारहाण केली. त्याला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणाने पोलीस अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र कार्यवाहीस विलंब होत असल्याचा आरोप अमित अलोणे या तरुणाने पत्रकार परिषदेतून केला आहे.
कोंढाणा येथील अमित अलोणे यांनी पोलीस अधीक्षकाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, बल्लारपूर येथील एका सोसायटीअंतर्गत गोंडपिपरीत गेल्या चार वर्षापासून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र अमित चालवित आहे. केंद्रासाठी लागणारे विविध साहित्य त्याने येथील पायल इलेक्ट्रानिक्स मधून खरेदी केले. राकेश पूनचे मामा निलेश संगमवार हे पायल इलेक्ट्रानिक्सचे संचालक आहेत. राकेश पून हे देखील दुकान चालवितात.
या दुकानातून अलोणे यांनी २१ हजार रुपयाचे साहित्य खरेदी केले. १५ हजार रुपये नगदी जमा केले व उर्वरित सहा हजार रुपये उधारीत ठेवले. पून यांनी ते मान्य केले. वर्ष लोटूनही अलोणे यांनी उधारीची रक्कम न दिल्याने निलेश संगमवार व राकेश पून हे संतापले होते. ५ आॅगस्ट रोजी अलोणे हा बोम्मावार महाविद्यालयात बसून असताना पायल इलेक्ट्रानिक्समधील नौकर तिथे पोहचले व पैशाची मागणी करू लागला. अलोणे याने १० ते १५ आॅगस्ट रोजी पैसे देण्याचे सांगितले. मात्र नौकराने फोनवरुन राकेश पून यांना बोलाविले. यानंतर पून याने जातीवाचक शिवीगाळ करीत ६० मीटर पर्यंत खेचत दुकानात नेले व तिथे संगमवार व पून यांनी अलोणे यास मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे म्हटले आहे.
या प्रकारानंतर अलोणे यांनी सदर प्रकाराबाबत पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली. त्यांनी हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडे वर्ग केले. मात्र बराच कालावधी लोटूनही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे अमित अलोणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (शहर प्रतिनिधी)
मद्यविक्रेत्यांना अटक
चंद्रपूर : अवैध दारूविक्री करताना पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून ९७ हजार ८०० रूपयाचा माल जप्त करून नऊ मद्यविक्रेत्यांना अटक केली. या कारवाईने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.