भद्रावती येथे बौद्ध महोत्सव
By Admin | Updated: November 2, 2016 00:56 IST2016-11-02T00:56:54+5:302016-11-02T00:56:54+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समपना निमित्त ..

भद्रावती येथे बौद्ध महोत्सव
भदन्त राहुल बोधी : आज जगाला बुद्धांच्या शांतीमय विचारांची आवश्यकता
भद्रावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समपना निमित्त ऐतिहासिक विंजासन बुद्ध लेणी, भद्रावती येथे दोन दिवसीय विराट बौद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विंजासन बुद्ध लेणी वर्षावास समिती भद्रावतीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त डॉ. राहुल बोधी (विपश्यनाचार्य) मुंबई तर उद्घाटक म्हणून डॉ. वाणास्वामी महास्थाविर, अरुणाचलप्रदेश हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भदन्त सदानंद महास्थवीर केळझर, भदन्त सत्यशिल महास्थवीर नगापूर, भदन्त खेमधम्मो महास्थविर नागपूर, भदन्त कृपाशरण महास्थविर चंद्रपूर, इंद्रेश गजभिये भोपाल, उपासक सन्नी थायलंड, दिनेश पाटील, डॉ. चंद्रबोधी नाईक, डॉ. पुरण मेश्राम, प्रो. डॉ. सुरजित सिंग तसेच समितीचे मार्गदर्शक विनयबोधी डोंगरे, सिद्धार्थ सुमन, अध्यक्ष लिनता जुनघरे, निलेश पाटील, संजय खोब्रागडे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ५० भिक्खुसंघ उपस्थित होते.
उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनयबोधी डोंगरे, संचालन सिद्धार्थ सुमन तर आभार संजय खोब्रागडे यांनी मानले. त्यानंतर उपस्थित सर्व भिक्खु संघांना चिवरदान करण्यात आले. भिक्खुसंघास भोजनदान डॉ. बि. प्रेमचंद व डॉ. माला प्रेमचंद भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात धम्मसंवाद व समारोपीय कार्यक्रम पार पडला. बौद्ध शासनात वर्षावासाचे महत्त्व व प्रासंगिकता यावर प्रा. डॉ. सुरजीतसिंग वर्धा यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सिद्धार्थ सुमन, संचालन संतोष रामटेके तर आभार जयदेव खाडे यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
समाजाला बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदला
आदर्श बौद्ध समाज निर्माण करणे आवश्यक आहे. समाजाला बदलवायचे असेल तर पहिले स्वत:ला बदलले पाहिजे. कुटुंब हा समाजाचा आधार आहे. कुटुंब बदलले पाहिजे आणि यासाठी स्वत:पासून सुरुवात करा, असे आवाहन भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी यावेळी केले. बौद्ध महोत्सवाच्या माध्यमातून एकत्रीत येवून धम्मचर्चा करणे, ही मंगलमय व जीवनात प्रकाश टाकणारी बाब आहे. धम्म श्रवण व पालन सर्वानी करावे, असेही ते म्हणाले. बौद्ध धम्म सागरा सारखा आहे. त्याला तलावासारखे बनवू नका. विहार हे शिक्षणाचे, प्रशिक्षणाचे, धम्माचे केंद्र आहे. तिथे दर रविवारी गेलेच पाहिजे असा आग्रहही त्यांनी धरला.