नामनिर्देशन पत्र छानणीत बसपाच्या उमेदवारांना फटका
By Admin | Updated: November 4, 2016 01:14 IST2016-11-04T01:14:28+5:302016-11-04T01:14:28+5:30
बल्लारपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छानणी बुधवारी करण्यात आली.

नामनिर्देशन पत्र छानणीत बसपाच्या उमेदवारांना फटका
बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदाचे दोन तर नगरसेवक पदाचे १३ उमेदवार बाद
बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छानणी बुधवारी करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी २२ तर ३२ नगरसेवकांच्या जागेसाठी १९६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील नगराध्यक्ष पदाच्या दोन तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतील १३ उमेदवारांना बाद करण्यात आले. येथील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बसपाच्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्र छानणीचा फटका बसला आहे. बसपाचे विविध प्रभागातील तब्बल ६ उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
येथील प्रभाग- १ ब मधील सोनु शर्मा, प्रभाग- २ अ मध्ये सचीन राजूरकर, प्रभाग- ८ अ मधील पोर्णिमा खोब्रागडे, प्रभाग- १२ अ मधील अरविंद कन्नाके, प्रभाग १३ ब मधील संजय झिल्लेवार व प्रभाग १४ अ मधील स्नेहा लोखंडे या बसपाच्या अधिकृत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना चुकीची माहिती दर्शविल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सीमा अहिरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास अहीर व मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी छानणीदरम्यान त्यांचे अर्ज अवैध ठरविले आहे. यामुळे बसपाच्या गोटात नाराजी दिसून येत आहे.
येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यापैकी सुरेश चौधरी व महादेव कांबळे यांचे नामांकन अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. आता १९ उमेदवार शिल्लक असून ११ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे. आजघडीला नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी १९ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले ओहत. यामध्ये भाजपाचे हरिश शर्मा, काँग्रेसचे एम. व्यंकटेश बालबरैय्या, बीआरएसपीचे राजू झोडे, शिवसेनाचे विनोद उर्फ सिक्की यादव, बसपाचे मारोती सोमकुवर, भारिप बहुजन महासंघाचे उमेश कडू, आरपीआयच्या वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्ताफ हाजी युनुस, आॅल इंडिया मजलीस इतेहदुल मुस्लिम लिगचे शेख अब्दुल रऊफ सुलेमान यांच्यासह नगरसेवक नासीर खान, माजी नगरसेवक भारत थुलकर यांचा समावेश आहे.
नगरसेवकांच्या १६ प्रभागातील ३२ जागेसाठी एकूण १९६ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. यातील १६ नामनिर्देशन पत्र छानणीदरम्यान अवैध ठरविण्यात आले. आता मात्र ३२ जागेसाठी १८० उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे. यावर्षीच्या नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीत नगराध्यक्ष थेट मतदारातून निवडून देण्याचे असल्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नमानिर्देशन पत्र दाखल करणे व नामांकन अर्जाची छानणी प्रक्रिया पार पडली आहे. (शहर प्रतिनिधी)