लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय कंत्राटदार असल्याचे भासवून बीएसएनएलच्या कॉपर वायर आणि अन्य साहित्याची लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक करून गजाआड केले. सोमवारी केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नरेंद्र सोरनसिंह मोर्या (२२) रा. उधैनी, नाजिमा शेख असमुद्दीन शेख (२६), रा. कलपिया दोघेही रा.बदायू (यूपी) यांना अटक केली आहे.
बीएसएनलमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता अभिजीत अशोक जिवणे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात ८ सप्टेंबर रोजी तक्रार केली होती. तक्रारीत त्यांनी २४ लाख रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल चोरीला गेल्याचे नमूद केले होते. ही तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. दरम्यान, कोसारा परिसरात एका आयशर ट्रकमध्ये कॉपर लोड करून ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी छापा टाकून ट्रकची तपासणी केली असता, त्यात चोरीचा कॉपर मुद्देमाल आढळला.
...अशी केली चोरी
चोरी करताना परिसरातील नागरिकांना संशय येऊ नये, म्हणून स्वतः शासकीय कंत्राटदार भासवत हेल्मेट, रिफ्लेक्टर, जॅकेट, प्लास्टिक बॅरिकेड्स लावून त्यांनी बीएसएनएलचा सर्व तार कापून चोरी केला. आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ४४ लाख ४८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात प्रामुख्याने कॉपर वायर व संबंधित साहित्याचा समावेश आहे. चोरांच्या या युक्त्तीने पोलिसही चक्रावले होते.