बीएस इस्पातचे कामगार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
By Admin | Updated: June 4, 2015 01:23 IST2015-06-04T01:23:16+5:302015-06-04T01:23:16+5:30
मागील दोन दिवसांपासून वरोरानजीकच्या बीएस इस्पात कंपनीच्या कामगारांनी विविध मागण्यासंदर्भात काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

बीएस इस्पातचे कामगार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
वरोरा : मागील दोन दिवसांपासून वरोरानजीकच्या बीएस इस्पात कंपनीच्या कामगारांनी विविध मागण्यासंदर्भात काम बंद आंदोलन सुरु केले आहे. कामगारांनी बुधवारी वरोरा शहरातून थेट चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
वरोरा शहरानजीकच्या मजरा गाव शिवारात बीएस इस्पात कंपनी आहे. बीएस इस्पात कंपनीत स्थायी व अस्थायी कामगार कार्यरत आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापन मधील अधिकारी कामगारांना तुम्ही काम सोडून जावे, अन्यथा कामावरुन कमी करण्यात येईल, अशा धमक्या देत असल्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप कामगारांनी एका निवेदनाद्वारे मनसे शहर अध्यक्ष मनिष जेठानी यांच्याकडे केला. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्याकरिता मनसेच्या वतीने पत्र देण्यात आले. परंतु चर्चा करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ मागील दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीचे काम बंद करुन आंदोलन सुरु केले. बुधवारी वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन केल्यानंतर मनसे शहर अध्यक्ष मनिष जेठानी यांच्या नेतृत्वात कामगार वाहनाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. जिल्हाधिकारी आता कोणता निर्णय घेतात, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)