‘बोनम्यारो’ आजार : उपचारासाठी हवे १० लाख रुपये आशिष घुमे । लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : हलाखीची परिस्थिती असतानाही कसेबसे आपल्या लाडक्या बहिणीचे हात पिवळे केले. मात्र लग्नानंतर काही दिवसातच बहिणीला ‘बोनम्यारो’ नावाचा दुर्धर आजार जडला. बहिणीच्या सासरची परिस्थितीही बेताचीच. त्यामुळे भावानेच होते तेवढे पैसे बहिणीच्या उपचारासाठी लावले. कर्जही घेतले. मात्र ती बरी झाली नाही. आता डॉक्टरांनी बोनम्यारो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया करावी लागणार, त्यासाठी १४ लाखांचा खर्च येईल व बोनम्यारो देणारा व्यक्तीही हवा, असे सांगताच भावाच्या पायाखालची जमीनच घसरली. आपल्या लाडक्या बहिणीसाठी त्याने आपला बोनम्यारो देण्याची तयारी दर्शविली. मात्र दहा लाखांसाठी तो दारोदारी मदतीसाठी याचना करीत फिरत आहे. वरोरा शहरातील हनुमान वॉर्डातील रहिवासी रवी पाटील याची बहीण निशा हिचे प्रमोद मैती रा. चंद्रपूर यांच्याशी २००७ मध्ये लग्न झाले. काही वर्ष सुरळीत गेल्यानंतर तिचे प्रकृती बिघडली. तिला अशक्तपणा जाणवायला लागला. अधेमधे चक्कर येऊ लागली. पण नेमका आजार आहे, हे सापडेना ! हळूहळू तिला आंधळेपणा येत असल्याचे जाणवले. ती डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी नागपूर येथील एका नामवंत दवाखान्यात दाखविण्याचा सल्ला दिला. तिथे तिला ‘बोनम्यारो’ हा आजार झाला असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी तिला बोनम्यारो ट्रान्सप्लांट करावा लागेल, असे सांगतिले व उपचाराकरिता १४ लाख खर्च येणार, असे सांगताच रवी हादरला व रडायला लागला. पण बहिणीचे हाल बघून रवीने स्वत:चा बोनम्यारो बहिणीला डोनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरज निशा अनेक राजकीय पुढाऱ्यांकडे मदतीचा हात मागायला गेली. पण कोरड्या आश्वासनाशिवाय तिला काहीच मिळाले नाही. तिचा थोरला भाऊ रवी पाटील हादेखील दारोदारी भटकत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन निशाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रवी पाटील करीत आहे.
बहिणीच्या उपचारासाठी भावाची धडपड
By admin | Updated: May 18, 2017 01:19 IST