चाकूने वार करून भावाचा खून
By Admin | Updated: March 31, 2015 01:03 IST2015-03-31T01:03:13+5:302015-03-31T01:03:13+5:30
तालुक्यातील चिंचोली येथील एका ४२ वर्षीय इसमाने चाकू भोसकून आपल्याच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना

चाकूने वार करून भावाचा खून
ब्रह्मपुरी : तालुक्यातील चिंचोली येथील एका ४२ वर्षीय इसमाने चाकू भोसकून आपल्याच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना सोमवारी चिंचोली शेतशिवारात सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
मुरलीधर केवळराम लांडगे असे मृत भावाचे नाव आहे. तर सत्यवान केवळराम लांडगे (४२) असे आरोपीचे नाव आहे. चिंचोली शिवारात लांडगे यांचे शेत आहे. आरोपी सत्यवान लांडगे हा मागील १५ वर्षांपासून शेतामध्ये झोपडी बांधून राहत होता. त्याचे गावातील कोणत्याही इसमाशी खास संबध नव्हते. एकप्रकारे सत्यवान हा मानसिकतेने दुर्बल असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत मुरलीधर लांडगे हे सोमवारी सकाळी ११ वाजता आपल्या शेतावर कामानिमित्ताने गेले असता, शेतावरच्या झोपडीतून आरोपी सत्यवान चाकू घेऊन आला व त्याने मुरलीधर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे मुरलीधर लांडगे यांचा जागीच मृत्यू झाला. मृत मुरलीधर आरोपी सत्यवानचा मोठा भाऊ असून कुटूंबामध्ये प्रमुख होता.
आरोपी सत्यवानने मुरलीधर यांना ठार मारल्यानंतर झोपडीत जावून नवीन कपडे घालून घटनास्थळावरून पसार झाला. घटनेचा मर्ग पोलिसांत दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीवर कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)