विजेच्या धक्क्याने भावाचा मृत्यू, बहीण जखमी
By Admin | Updated: May 13, 2015 00:03 IST2015-05-13T00:03:41+5:302015-05-13T00:03:41+5:30
भाचीच्या विवाह सोहळ्याकरिता बहीण भावाच्या घरी आली. अंगणात वाळवायला टाकलेले कपडे काढत

विजेच्या धक्क्याने भावाचा मृत्यू, बहीण जखमी
वरोरा : भाचीच्या विवाह सोहळ्याकरिता बहीण भावाच्या घरी आली. अंगणात वाळवायला टाकलेले कपडे काढत असताना बहिणीला शॉक लागल्याने भाऊ मदतीसाठी धावून आला. मात्र भावालाही विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू तर बहीण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील विस्लोन येथे घडली.
गुणवंत नामदेव बोबडे असे मृत भावाचे नाव आहे. जखमी बहिणीवर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहे. माजरी पोलीस स्टेशन अंतर्गत विस्लोन गावातील गुणवंत बोबडे यांच्या घरी खेमजई येथील वंदना निब्रड ही बहीण भाचीच्या विवाह सोहळ्यासाठी आली होती. भाचीचा विवाह सोहळा एक दिवसापूर्वी पार पडला.
मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास अंगणात असलेल्या तारावर वाळलेले कपडे काढण्याकरिता वंदना गेली असता, तिला विद्युत शॉक लागला. ही बाब भाऊ गुणवंत बोबडे यांच्या लक्षात येताच, त्यांनी बहिणीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
बहीण बाजूला जाऊन पडली, मात्र भाऊ गुणवंत यास विद्युत शॉक लागला. घरी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी तत्काळ घरातील मेन स्वीच बंद केला. तेव्हा दोघेही भाऊ बहीण जखमी होऊन पडले. दोघांनाही वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता गुणवंत बोबडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर वंदना निब्रड यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने विस्लोन गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)