ब्रिटिशकालीन संवेदनशील पोलीस ठाणे

By Admin | Updated: February 18, 2015 00:57 IST2015-02-18T00:57:50+5:302015-02-18T00:57:50+5:30

ब्रिटिशकालीन आसोला मेंढा तलावाच्या निर्मितीचा निर्णय इंग्रजांनी घेतला. तत्पूर्वीच पाथरी येथे पोलीस ठाणे कार्यरत असल्याचे सांगण्यात येते.

British Sensitive Police Station | ब्रिटिशकालीन संवेदनशील पोलीस ठाणे

ब्रिटिशकालीन संवेदनशील पोलीस ठाणे

उदय गडकरी  सावली
ब्रिटिशकालीन आसोला मेंढा तलावाच्या निर्मितीचा निर्णय इंग्रजांनी घेतला. तत्पूर्वीच पाथरी येथे पोलीस ठाणे कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. १८९० मध्ये आसोला मेंढा तलावाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत पोलीस ठाणे कार्यरत असल्याची माहिती आहे. सावली येथे पोलीस ठाणे निर्माण होण्यापूर्वी पाथरी पोलीस ठाणे एकमेव होते. त्या ठाण्यांतर्गत आजपर्यंत अनेक गुन्हे घडले आहेत. सावली पोलीस ठाण्याच्या निर्मितीपूर्वी पाथरी पोलीस ठाण्याचा अवाका सुमारे ५० चौरस किलोमिटरपेक्षा जास्त होता. मात्र आता सावली तालुक्यात दोन पोलीस ठाणे असल्यामुळे कार्यक्षेत्र विभागले गेले. सुमारे २० चौरस किलोमिटर परिसरात पाथरी पोलीस ठाणे विस्तारले आहे. या ठाण्यांतर्गत गत वर्षभरात खुनाची एक घटना, १६ आत्महत्या, आठ अपघात, दोन बलात्कार, व चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. अवैध दारू विक्रीबाबतचेही २३ गुन्हे दाखल आहेत. जंगलव्याप्त आणि दुर्गम भाग असला तरी अवैध धंद्यात वाढ झालेली नाही.
कर्मचारी व निवासस्थानांची गरज
चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी हे सर्वात जुने पोलीस ठाणे आहे. इंग्रजांच्या राजवटीत कार्यान्वित झालेल्या या ठाण्यात पूर्वी ७८ कर्मचारी कार्यरत होते. आज केवळ ३१ कर्मचारी व एक अधिकारी कार्यरत आहेत. पोलिसांची फक्त १५ निवासस्थाने आहेत. पुन्हा २२ निवासस्थानांची आवश्यकता आहे. पाथरी परिसरात ग्रामीण भाग असल्यामुळे त्या गावात भाड्याचे घर मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवास्थाने तयार होणे गरजेचे आहे.
२० चौ. कि.मी. क्षेत्रफळात विस्तार
५० गावांचा अंतरभाव असलेल्या पाथरी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र २० ते २२ चौरस किलोमीटर अंतरावर आहे.यात सावली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले करोली, आक्कापूर हे गाव पाथरी ठाण्याच्या मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर आहे, तर सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही, पवनपार हे क्षेत्रसुद्धा पाथरी पोलीसांच्या हद्दीत येते. या ठाण्यांतर्गत गेवरा ही एकमेव पोलीस चौकी आहे.
नक्षल समर्थक महिलेला अटक
या परिसरात कोणत्या वेळी काय प्रसंग ओढावेल, याचा काही नेम नाही. चार वर्षांपूर्वी पाथरी येथून एका नक्षल समर्थक महिलेला चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ती आपल्या नातेवाईकाकडे पाहुणी म्हणून आली होती. तिच्याकडून नक्षल चळवळीसंदर्भातील बरेच साहित्य हस्तगत करण्यात आले होते.
मागील वर्षात गुन्ह्यांचे प्रमाण कमी
आजपर्यंत या पोलीस ठाण्याने अनेक घटना अनुभवल्या आहेत. मागील वर्षीच्या केवळ दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्या १६, अपघात आठ, बलात्कार दोन, चोरीच्या घटना तीन आहेत. चार महिन्यांपूर्वी उसरपार चक येथील एका महिलेने आपल्या दोन मुलींसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. २०१३ मध्ये त्याच परिसरात लग्नासाठी पाहुणी म्हणून आलेल्या एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. त्यातील आरोपी संजय नवघडे याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
धार्मिक स्थळे
सावली तालुक्यात अनेक जाती धर्मातील लोक वास्तव्याला आहेत. या पोलीस ठाण्यांतर्गत ३५ ते ४० मंदिराची संख्या आहे. बुद्धविहारांची संख्या सहा आहे. पालेबारसा येथे पुरातन हेमांड पंथी मंदिर आहे. मंगरमेंढा येथील मंदिरात शिव यात्रा भरते. तसेच गुंजेवाही येथे सुद्धा अंबेजोगाई मातेची यात्रा भरते.
संवेदनशील परिसर
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला ब्रिटिशकालीन आसोला मेंढा तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. तसेच प्रेमीयुगुलांना एकांत मिळण्याचेही स्थान झाले आहे. प्रेमीयुगुलांचा वावर या परिसरात नसला तरी कोणत्याही वेळी अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतत सतर्क व जागृत असल्याचे सांगितले जाते. या पूर्वीही अनेक लहान मोठ्या कारवाया झाल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी या ठाण्यांतर्गत येणाऱ्या व्याहाड (खु.) पोलीस चौकीच्या तपासणी नाक्याच्या राहुटीतून रायफल चोरीला गेली होती.

Web Title: British Sensitive Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.