डोंगरगावच्या पुलास एका महिन्यात तडे
By Admin | Updated: March 29, 2015 01:11 IST2015-03-29T01:11:20+5:302015-03-29T01:11:20+5:30
येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधलेल्या डोंगरगाव येथील पुलास एकाच महिन्यात तडे गेले आहे.

डोंगरगावच्या पुलास एका महिन्यात तडे
नागभीड : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधलेल्या डोंगरगाव येथील पुलास एकाच महिन्यात तडे गेले आहे. या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
पावसाळ्यात गावकऱ्यांचा रस्ता अडू नये यासाठी डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ पुल बांधण्यात आला. गावकऱ्यांच्या माहितीनुसार मार्च एडींगच्या नावाखाली या पुलाचे बांधकाम अतिशय घाईने करण्यात आले. साहित्य निकृष्ठ व कमी प्रमाणात वापरण्यात आले. आवश्यक प्रमाणात पाणी सुद्धा मारण्यात आले नाही. परिणामी बांधकामानंतर एकाच महिन्यात या पुलाला भेगा पडल्या.
डोंगरगाव येथील एका नागरिकाने यासंदर्भात संबधित विभागाकडे चौकशी केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती आहे. डोंगरगावच्या जवळच हा पुल आहे. गावातील पुलाचे जर बांधकाम अशाप्रकारे होत असेल तर यात विभागाने आडमार्गावरील पुलाचे बांधकाम कशाप्रकारे केले असतील अशी विचारणा डोंगरगावमध्ये होत आहे. या बांधकामाची चौकशीच करावयाची असेल तर, अन्य विभागाच्या तज्ज्ञाकडून करण्यात यावी, अशी मागणी आहे. या पुलाचे बांधकाम पाहून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विश्वालाच तडा गेला अशी गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. (तालुका प्रतिनिधी)