मच्छीगुड्याकडे जाणारा पूल कोसळला
By Admin | Updated: May 15, 2014 01:04 IST2014-05-15T01:04:36+5:302014-05-15T01:04:36+5:30
नागरिकांना दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाने गाव तिथे रस्ता ही योजना राबविली. या अंतर्गत लाखो रुपये..

मच्छीगुड्याकडे जाणारा पूल कोसळला
राजुरा : नागरिकांना दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाने गाव तिथे रस्ता ही योजना राबविली. या अंतर्गत लाखो रुपये खचरून मच्छीगुडा या गावाकडे जाण्यासाठी रस्ता व पूल तयार केला. हा पुल पावसाळ्यात अर्धाअधिक वाहून गेला. तर उर्वरित पूल कोसळला आहे. आता या पुलापुढे मोठा खड्डा पडला असून नागरिकांना गावाकडे जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
डोंगराळ व दुर्गम गावापर्यंत जाण्यासाठी शासनाने रस्त्याचे जाळे विणले. यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र नियोजनाअभावी निकृष्ठ कामे केली जात आहे.
दोन वर्षापूर्वीच मच्छिगुडा या गावाकडे जाणारा रस्ता आणि त्या गावाला जोडणारा पुल बांधण्यात आला. पुलासारखा दिसणार्या रपट्याच्या बांधकामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र पूल कोसळल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी उखडली आहे. अत्यंत कमी उंचीचा पुल तयार करण्यात आल्याने याच पुलापुढे मोठा खड्डा पडला आहे.
या गावाकडे जायचे असल्यास वाहन जात नाही. पाच किलोमिटर पायदळ जावे लागते. हा पुल व गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला. त्यामुळे तो तयार झाल्यानंतर काही काळातच त्याची दुरवस्था झाली. अतिदुर्गम भागातील गावांना इतर गावाशी जोडण्याच्या उद्देशाने हा भारी ते मच्छीगुडा रस्ता शासनाने तयार केला.परंतु कंत्राटदार आणि या कामावर देखरेख करणार्या अभियंत्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्यात आला. पुलाची उंचीसुद्धा अत्यंत कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात अर्धा पूल वाहून गेला. या कामात केवळ पैशाची उधळपट्टी झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्ता व पुलाच्या कामाची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून चौकशी होणे गरजेचे आहे. जोपर्यंत ग्रामीण भागातील कामाची पाहणी योग्य होणार नाही, तोपर्यंत असाच भोंगळ कारभार सुरू राहील. अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या योजना ग्रामीण क्षेत्रात पोहचूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
ग्रामीण भागात रस्ता तयार करण्यासाठी शासन मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करतात. परंतु कमीशन पद्धतीमुळे ग्रामीण भागाच्या विकासापेक्षा अन्य व्यक्तींचाच विकास होताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)