पोटासाठी करतात चित्तथरारक कसरत
By Admin | Updated: February 11, 2015 01:13 IST2015-02-11T01:13:10+5:302015-02-11T01:13:10+5:30
‘जब तक तेरे पैर चलेंगे तब तक उसकी सांसे चलेगी’ हा संवाद प्रसिद्ध चित्रपटात एका प्रसंगात आहे.

पोटासाठी करतात चित्तथरारक कसरत
राजकुमार चुनारकर खडसंगी
‘जब तक तेरे पैर चलेंगे तब तक उसकी सांसे चलेगी’ हा संवाद प्रसिद्ध चित्रपटात एका प्रसंगात आहे. आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी प्रेयशी आपल्या जीवाची पर्वा न करता काचावर नृत्य करते. मात्र, आपल्या वितभर पोटाची भूक भागवण्याकरिता याहीपुढे जावून भयानक जोखीम पत्करून काचेचे ट्यूबलाईट व काचेच्या शिश्या डोक्यावर व शरीरावर फोडून ते चक्क काचावरुन चालतात. मात्र, त्यांच्या जीवनात हे काचही फुलं बनले आहेत.
हा चित्तथरारक प्रसंग मिनी सुपर सायकल सर्कस मधील कलाकार नयन भारती उर्फ निलेश नाईक यांनी करून दाखविल्याने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रुही आपोआप बाहेर आले. मानवाला जीवन जगण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागतात. यासाठी प्रत्येक जण आपल्यापरीने कार्य करतो. मात्र समाजात आजच्या घडीला अनेक परिवाराला दोन वेळची चुल पेटवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यात काही व्यक्ती आपल्या अंगी असलेली कला जनतेपुढे दाखवून कलेलाच आपले उपजिविकेचे साधन बनवतात.
वर्धा येथील गौरक्षण वॉर्डात राहणारा संच चालक मोहीतकुमार भारती या युवकाने वयाच्या बाराव्या वर्षी घराबाहेर पडून अशाच चित्तथरारक शो मध्ये काम शिकून ही कला आपल्या परिसरातील युवकांना शिकविली. काही कलाकाराच्या मदतीने त्यांनी ‘मिनीसुपर सर्कस’ तयार केला. या संचातील कलाकार गावागावात फिरून आकाशालाच छत करून आपल्या अंगी असलेली कला गावकऱ्यांना दाखवित आहेत.
आठ महिने हे कलाकार आपली कला दाखवून कलेतून आलेल्या रकमेतून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. या मिनी सर्कसमध्ये सहा कलाकाराचा समावेश आहे. या कलाकारास या कलेतून महिन्याकाही दहा हजार रूपयांपर्यंत आवक होत असते.
मिनी सर्कसमधून नयन भारती उर्फ निलेश नाईक हा कलाकार जळत्या गोलातून सायकल चालवितो, बाभळीच्या काट्यावर शरीर झोकून देणे, गालातून दाबन टाकून पाण्याची बादली उचलने असे अनेक चित्तथरारक प्रयोग दाखवितो.
मात्र खडसंगी गावात काल दाखविलेल्या ट्युब लाईट व काचेच्या शिश्याचे काच डोक्यावर व शरीरावर फोडून त्यावर चक्क अनवानी पायानी चालतात. हेच काच इतरांना जखमा करणारे ठरतात. मात्र वाढत्या बेरोजगारीत कामाच्या शोधात असताना स्वाभीमानाने जगावे म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता दोन वेळच्या जेवणाची चूल पेटविण्यासाठी हेच ‘काच’ मिनी सुपर सायकल सर्कसमधील कलाकार निलेश नाईक यांच्यासाठी फुल झाले आहेत.