छोट्याशा खोलीत गुदमरतोयं चिमुकल्यांचा श्वास
By Admin | Updated: February 22, 2015 00:53 IST2015-02-22T00:53:23+5:302015-02-22T00:53:23+5:30
उमलत्या कळ्यांना योग्य वातावरणासोबत खतपाणी मिळाल्यास चांगली फुले निर्माण होतात, त्याच प्रमाणे लहान अज्ञान बालकांना चांगल्या वातावरणात चांगले संगोपन...

छोट्याशा खोलीत गुदमरतोयं चिमुकल्यांचा श्वास
नितीन मुसळे सास्ती
उमलत्या कळ्यांना योग्य वातावरणासोबत खतपाणी मिळाल्यास चांगली फुले निर्माण होतात, त्याच प्रमाणे लहान अज्ञान बालकांना चांगल्या वातावरणात चांगले संगोपन होऊन योग्य धडे मिळाल्यास भविष्यात एक सुंदर पिढी निर्माण होण्यास मदत होते. त्याकरिता शासनाच्या वतीने विविध भागात आंगणवाड्या चालविल्या जात आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही. भाड्याच्या आणि अतिशय छोट्या खोल्यांमध्ये चिमुकल्यांना धडे गिरवावे लागत आहे. या छोट्या खोल्यांमध्ये बालकांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे दहा वर्षांपासून लहान बालकांना एका लहानग्या पडक्या इमारतीत बाळकडू पाजल्या जात होते. परंतु दिर्घ प्रतीक्षेनंतर एक सुसज्ज इमारत मिळाली. परंतु त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने आजही लहान बालके लहानग्या खोलीत आपले भविष्य घडवित आहे. कोरपना तालुक्यांंतर्गत असलेल्या नांदगाव ग्रामपंचायतीत जैतापूर येथील अंगणवाडी पाणलोट क्षेत्रांतर्गत बांधण्यात आलेल्या एका अरुंद खोलीत मागील तीन वर्षांपासून अंगणवाडी सुरू आहे. याठिकाणी शासनाच्या वतीने सन २०१३ मध्ये अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आज बांधकाम होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असूनही त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने इमारत रिकामी पडलेली आहे. रिकाम्या पडलेल्या या नवीन इमारतीत गावात कामासाठी येणारे कामगार निवासासाठी आसरा घेत आहेत. उद्घाटनापूर्वीच इमारतीची फरशी फुटलेली आहे तर खिडक्यांची तावदानेसुद्धा तुटलेले असून उद्घाटनाअभावी इमारतीची दुरावस्था होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील दहा वर्षांपासून पडक्या अंगणवाडीच्या इमारतीत लहान बालकांना आपले लहानपणीचे शिक्षण घ्यावे लागले आणि आज इमारत असूनसुद्धा दहा बाय पंधरा फुट क्षेत्रफळ आकाराच्या खोलीत शिक्षण घ्यावे लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. ज्या ठिकाणी लहान बालकांना श्वास गुदमरतो, त्याच ठिकाणी त्यांना बाळकडू घ्यावे लागत आहे. शासन गोरगरीब जनतेच्या कल्याणाचे हित समोर ठेवून करोडो रुपयांच्या योजना आखत असते. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शासनाच्या करोेडो रुपयांच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्या निर्रथक ठरत आहे.