स्त्री अत्याचाराविरोधात ब्रह्मपुरीत मुकमोर्चा
By Admin | Updated: November 3, 2016 02:14 IST2016-11-03T02:14:09+5:302016-11-03T02:14:09+5:30
आवळगाव येथील काजल दुमणे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी रेटून धरण्यासाठी

स्त्री अत्याचाराविरोधात ब्रह्मपुरीत मुकमोर्चा
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : अनेक मागण्या रेटून धरल्या
ब्रह्मपुरी : आवळगाव येथील काजल दुमणे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी रेटून धरण्यासाठी ब्रह्मपुरी येथे भटक्या विमुक्त संघर्ष समितीतर्फे मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
भटके विमुक्ती संघर्ष समिती व एकलव्य सेनेद्वारे आयोजित स्त्री अत्याचाराच्या विरोधात व संपूर्ण स्त्री जातीत सामाजिक असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील काजल राजेंद्र दुमणे या अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी येथील उपविभागीय कार्यालयावर मुक मोर्चाचे आयोजन आज बुधवारला करण्यात आले. याला जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अंदाजे १० हजार जनसमुदाय मोर्चा निघण्यापूर्वीच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उपस्थित होता. तिथून मोर्चा दुपारी १ वाजता उपविभागीय कार्यालयाकडे निघाला. सदर मोर्चा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे चौक, क्रांतीवीर नारायण सिंह चौक ते मुख्य रस्त्याने सावरकर चौक, शिवाजी चौक मार्गे शिस्तबद्ध पध्दतीने मार्गक्रमण करीत राहिला. कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांतपणे मोर्चेकरी येथील तहसील कार्यालयातील उपविभागीय कार्यालयावर धडकले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना एका शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. भटक्या विमुक्त यांना न्याय देवून अॅक्ट्रासिटी लागू करण्यात यावा, आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, जलदगती न्यायालयात खटला चालवून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, यासह अनेक मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
मोर्चात प्रामुख्याने गडचिरोली, सिंदेवाही, मूल, भिवापूर येथील असंख्य भोई समाजबांधव आबालवृद्ध हजर होते. मोर्चात आमदार विजय वडेट्टीवार, अशोक रामटेके, रिपाइं नेते, विनोद झोगडे, यशवंत दिघोरे, मिलींद भन्नारे, अश्विनी जनबंधू यांच्यासह असंख्य कार्यकर्तेही सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)