ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा
By Admin | Updated: October 30, 2015 01:14 IST2015-10-30T01:14:30+5:302015-10-30T01:14:30+5:30
तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील शेतजमिनीवरील पिकांचे सर्वेक्षण करून सुधारित पैसेवारीत समाविष्ट करून तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा,...

ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा
ब्रह्मपुरी : तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील शेतजमिनीवरील पिकांचे सर्वेक्षण करून सुधारित पैसेवारीत समाविष्ट करून तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात १०४९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. परंतु सरासरी पर्जन्यमानापेक्षा ३० ते ४० टक्के पाऊस यावर्षी कमी झाला आहे. कमी पावसामुळे काही रोवणी अजूनही खोळंबलेली आहे. काही आवत्या व रोवण्या विहीर पंप व कमी पावसाच्या भरवश्यावर करण्यात आल्या. हलक्या धानाला कमी पाऊस लागत असल्याने त्याने कसे तरी तग धरले. परंतु जड धानाला कमी पाऊस जड जात आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कोसोदूरवरुन पाणी आणून जड धानाला जगविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले आहे. तरी उत्पन्न मात्र ५० टक्केच्या वर जाईल, याची शास्वती नाही. त्यामुळे संबंध तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी सर्वाची मागणी आहे.
परंतु १९९९ ला शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी काही निकष ३० वर्षापूर्वीचे असल्याने घोषित होण्यासाठी आडकाठी येत असते. शासनाने १९९९ ला पैसेवारीचे तीन प्रकार पाडून त्यामध्ये जो भाग समाविष्ट असेल, त्या गटात मोडला जाते. सुधारित पैसेवारी व अंतिम पैसेवारी अशा तीन प्रकारापैकी ब्रह्मपुरी तालुका नजरअंदाज पैसेवारीत ५७ टक्के प्रमाणात समाविष्ठ आहे. परंतु यानंतर शासनाचे प्रतिनिधी पुन्हा पिकांचे सर्वेक्षण करून १५ नोव्हेंबरपर्यंत सुधारित पैसेवारी जाहीर करणार असल्याने सुधारित पैसेवारीमध्ये शेतपिकांचे योग्य सर्वेक्षण करून ब्रह्मपुरी तालुका त्यात समाविष्ठ करावा व संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी, लोकप्रतिनिधी आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)