ब्रह्मपुरी महोत्सव विविध कार्यक्रमांनी फुलला !
By Admin | Updated: January 4, 2016 03:29 IST2016-01-04T03:29:35+5:302016-01-04T03:29:35+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर (ब्रह्मपुरी) शनिवारपासून सुरू असलेल्या व सलग चार दिवस चालणाऱ्या ब्रह्मपुरी महोत्सवाने

ब्रह्मपुरी महोत्सव विविध कार्यक्रमांनी फुलला !
महोत्सवाचा दुसरा दिवस : भरगच्च कार्यक्रमांनी ब्रह्मपुरीत आनंदोत्सव
रवी रणदिवे/ घनश्याम नवघडे ल्ल ब्रह्मपुरी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर (ब्रह्मपुरी) शनिवारपासून सुरू असलेल्या व सलग चार दिवस चालणाऱ्या ब्रह्मपुरी महोत्सवाने मोहरून गेला आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी मिळाली. मॅरेथान स्पर्धा, आरोग्य शिबिर, कृषी मेळावा, चर्चासत्र, सरपंच सत्कार सोहळा व लोकमत सखी मंचद्वारा आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा तथा आई या विषयावर अर्पना रामतिर्थकर सोलापूर यांच्या व्याख्यानाने महोत्सवाचा दुसरा दिवसही गाजला.
महोत्सवाचे व्यापक स्वरूप लक्षात घेता आज रविवारी सकाळी ८ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरातून विविध गटात मॅरेथान स्पर्धा घेण्यात आली. त्यात तालुक्यातील तब्बल ५०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मपुरी तालुका आयएमएचे डॉ. भारत गणवीर, डॉ. रविशंकर आखरे, डॉ. नागमोती यांच्यासह आयएमएचे सर्व डॉक्टरांनी सेवा दिली. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रितमकुमार खंडाळे यांची चमू, बेटाळा महाविद्यालयाचे फार्मसी शाखेचे विद्यार्थी व शासकीय दंत्त महाविद्यालय नागपूरच्या डॉक्टरांचे पथक या शिबिरात हजारो नागरिकांची तपासणी करीत होते. शिबिरात मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. ५० च्यावर रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले. त्यानंतर दुपारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात आधुनिक शेती, तंत्रज्ञान आणि शेतीविषयक माहितीवर कृषी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. उदघाटन कृषी विभाग नागपूरचे विभागीय सहसंचालक विजय गारटे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतीतील आंतरराष्ट्रीय संशोधक बबलू चौधरी व गौरव केदार उपस्थित होते. यावेळी बबलू चौधरी यांनी युरोपमधील शेतीचे विविध दाखले देत शेतकऱ्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. गौरव केदार यांनी सेंद्रीय शेती, सिंचन व्यवस्था व आधुनिक शेती यावर विस्तृत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार सोहळा आयोजित करुन शेकडो सरपंचांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी महिलांसाठी लोकमत सखी मंचद्वारा आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रीती कऱ्हडे, शिला चरपटे, साधना केळझरकर यांच्या नेतृत्वात कार्यक्रम झाला. ‘आई’ या विषयावर भारतीय कुटुंब व्यवस्थेवर विचार मांडण्यासाठी अर्पणा रामतिर्थकर सोलापूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवजयंती उत्सव समिती ब्रह्मपुरी यांनी पुढाकार घेतला होता. रात्री ७ वाजता ‘शिर्डी के साईबाबा’ हे महानाट्य शिवाल रंगभूमीवर सादर करण्यात आले.
खंडीत सांस्कृतिक परंपरेला महोत्सवामुळे चालना
४२ ते ५ जानेवारीपर्यंत सुरु असलेल्या ब्रह्मपुरी महोत्सवानिमित्त दिर्घ काळापासून खंड पडलेल्या सांस्कृतिक परंपरेला चालना मिळाली असल्याची प्रतिक्रिया महोत्सवात सहभागी नागरिकांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली. ब्रह्मपुरीचे वैशिष्ट्य लक्षात घेता ही नगरी शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिकदृष्ट्या नावलौकिकाची होती. पुढे शैक्षणिक व वैद्यकीय सोयींचा विकास होत गेला. परंतु बऱ्याच कालखंडापासून सांस्कृतिकदृष्ट्या हा परिसर मागे गेला. विदर्भ साहित्य संमेलने, दलित साहित्य संमेलने, राज्य व विदर्भस्तरीय एकांकीका स्पर्धानी ही नगरी कधीकाळी नामांकित झाली होती. दरम्यान हे संपूर्ण उपक्रम बंद झाल्याने सांस्कृतिक उपक्रमावर अवकळा पसरलेली होतीे. परंतु या खंडित सांस्कृतिक परंपरेला चालना देण्याची अभिनव कल्पना आमदार विजय वडेट्टीवार यांनी मनात आणली व ती प्रत्यक्ष साकारण्याची धुरा कार्यकर्त्यांनी मनापासून खांद्यावर घेतली. ‘ब्रह्मपुरी महोत्सव’च्या रुपात ती आज प्रत्यक्षात उतरली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसराला कुंभमेळाव्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. महोत्सवात आमदार विजय वडेट्टीवार सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन गांभीर्याने विचारपूस करुन त्यावर तोडगा काढत असल्याने महोत्सव अधिकच फुलले आहे. ब्रह्मपुरी महोत्सवाच्या निमित्ताने महोत्सवाची स्मरणीका प्रकाशित केल्याने आठवणीचा खजिना म्हणून त्याचा उपयोग सदैव डोळ्यासमोर राहणार आहे.