वृक्ष लागवडीअभावी ब्रह्मनगरी हॉट

By Admin | Updated: April 24, 2016 01:08 IST2016-04-24T01:08:55+5:302016-04-24T01:08:55+5:30

विदर्भात ब्रह्मपुरीचे नाव उन्हाळा आला की, अग्रक्रमाने घेतले जाते. शहरात व तालुक्यात तापमान वाढण्यामागील मुख्य कारण परिसरात वृक्ष लागवडीचा अभाव आहे.

Brahmannari Hot due to tree plantation | वृक्ष लागवडीअभावी ब्रह्मनगरी हॉट

वृक्ष लागवडीअभावी ब्रह्मनगरी हॉट

वृक्ष संगोपनाला प्राधान्य नाही : वृक्षारोपण केवळ औपचारिकता
ब्रह्मपुरी : विदर्भात ब्रह्मपुरीचे नाव उन्हाळा आला की, अग्रक्रमाने घेतले जाते. शहरात व तालुक्यात तापमान वाढण्यामागील मुख्य कारण परिसरात वृक्ष लागवडीचा अभाव आहे. नवीन झाडे वाढवून संगोपन केले जात नाही. त्यामुळे ब्रह्मपुरीकरांना उन्हाचे चटके, गरम वाऱ्याची झळ सोसावी लागत आहे.
मागील अनेक वर्षांपासून वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतला जात असून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. परंतु अजूनही नवीन वृक्षांची मालिका बहरली आहे, असे चित्र सध्या कुठेच दिसत नाही. शहर परिसरात दहा कि.मी. भागात वृक्षांची लागवड नसल्याने शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहरात अनेक सामाजिक संघटना, संस्था, पक्ष यांच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जातो. तो कवेळ फोटोसेशनसाठी असतो. लावलेल्या त्या रोपांचे संगोपन करण्यात येत नाही. शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करण्याची गरज आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही. वृक्षारोपणावर झालेला खर्च व्यर्थ जातो. नगरपालिकेने वर्षानुवर्षे वृक्ष कर घेण्यावर भर दिला आहे. पण झाडे जगविण्याची जबाबदारी मात्र झटकली असल्याने नागरिकही बिनधास्त आहेत. रस्त्यांच्या मधोमध डिवायडर ओस पडली आहेत तर अनेक वनविभागाच्या जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नगरपालिकेने प्रत्येक नागरिकांना घरासमोर एक झाड लावून वाढविणे सक्तीचे करणे आवश्यक आहे. जेणेकरुन ब्रह्मनगरीचे तापमान कमी होण्यास मदत होईल व सर्वच या भीषण आपत्तीमधून मोकळे होतील. ब्रह्मपुरीचा एकेकाळी वातावरणाविषयी चांगला लौकीक होता. आता मात्र वृक्षांच्या अभावाबरोबरच इतरही समस्या वाढण्याला सुरुवात झाली आहे. आता परिस्थिती बदलली असल्याने ब्रह्मपुरीची ओळख समस्याचे माहेरघर असे होऊन पूर्वीची ओळख पुसली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Brahmannari Hot due to tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.