वृक्ष लागवड करण्यास कन्हारगाववासीयांचा बहिष्कार
By Admin | Updated: July 3, 2017 01:00 IST2017-07-03T01:00:30+5:302017-07-03T01:00:30+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली जात आहे.

वृक्ष लागवड करण्यास कन्हारगाववासीयांचा बहिष्कार
वनविकास महामंडळातील प्रकार : अधिकाऱ्यांचे दडपशाहीचे धोरण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : संपूर्ण महाराष्ट्रात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली जात आहे. यासाठी वनविभागासह इतर विभागानी पुढाकार घेतला आहे. या महोत्सवात संपूर्ण जिल्हा सहाभागी झाला असून लोकसहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र या वृक्ष लागवडीला कन्हारगाववासी अपवाद आहेत.
मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हारगाव वनपरिक्षेत्रात आज घडीला एकही झाडाचे रोपवन झाले नाही. वनविकास महामंडळातील वरिष्ठ अधिकारी यासाठी कुठलीही तयारी केली नाही. या महोत्सवात लोकसहभागासाठी गावकऱ्यांशी कधीही चर्चा केली नाही. त्याबाबत पुसटशी कल्पना दिली नाही. महामंडळातील अधिकारी मागील वर्षभरापासून जंगलात काम करणाऱ्या मजुरांशी व कर्मचाऱ्यांशी दडपशाहीचे तंत्र वापरत आहेत. त्यामुळे गावकरी त्रस्त आहेत.
या वनक्षेत्रात कामाची जबाबदारी असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकारी दबावाने अल्पशा मजुरीत मजुरांकडून कामे करवून घेतात. तसे न केल्यास कामावरुन बंद काढण्याच्या धमक्या देतात. स्थानिकांनी आम्ही दिलेल्या मजुरीत काम न केल्यास परप्रांतीय मजुरांकडून कामे करवून घेवू, असे सांगितले जाते.
कामावर आलेल्या मजुरांना कुठलीही सुरक्षा दिली जात नाही. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात नाही. शुद्ध पिण्याचे पाणीही पुरविल्या जात नाही. परिणामी मजुरांवर विपरीत परिणाम होतो. एकप्रकारे वरिष्ठ अधिकारी मजुरांचे, गावकऱ्यांचे विविध प्रकारे शोषण करीत असतात. त्यामुळेच कन्हारगावातील व परिसरातील जनतेनी वृक्ष लागवडीच्या महोत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण सप्ताहात एकही झाड न लावण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. त्याची सुरुवात १ जुलैला झाली. या दिवशी एकही झाडाची लागवड या गावात करण्यात आली नाही.
वनविकास महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे ना. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले चार कोटी वृक्ष लागवड करण्याच्या वनमहोत्सवाला जनतेत जागृती न करुन व जनतेचा सहभाग घेण्यासाठी कुठलीही तयारी न केल्याने हरताळ फासले आहे.